पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणाचे काम दिवाळीत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे काम १०७ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कामाच्या काळात रेल्वेस्थानक दररोज दोन ते चार तास बंद राहणार आहे, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. यामुळे ऐन दिवाळीच्या काळात याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसणार आहे.

रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकातील फलाट विस्तारीकरणाचे काम उन्हाळ्यात केले जाणार होते. त्यानंतर ते पावसाळ्यात सुरू करावे, अशी चर्चा सुरू झाली. आता दिवाळीत हे काम केले जाणार आहे. या कामासाठी सूक्ष्म पातळीपासून नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी रेल्वेच्या पुणे विभागाने रेल्वे मंडळाला पावसाळ्यानंतर काम सुरू करावे, असे कळवले होते. त्यानुसार दिवाळीत हे काम सुरू होणार आहे. फलाट विस्तारीकरणामुळे पुणे रेल्वे स्थानक दररोज दोन ते चार तास बंद ठेवावे लागणार आहे.

हेही वाचा >>> पुणे: देशातील सात शहरांमध्ये बांधकाम सुरू असलेल्या घरांना वाढती पसंती… जाणून घ्या कारणे आणि शहरे

दिवाळी हा सुट्यांचा काळ असल्यामुळे अनेक जण बाहेर जाण्याची योजना आखतात. त्यामुळे साहजिकच या काळात गाड्यांना गर्दीही खूप असते. नेमक्या याच काळात फलाट विस्तारीकरणामुळे स्थानक दररोज दोन ते चार तास बंद असेल. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होणार आहे. सध्या स्थानकातून सुटणाऱ्या, येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दैनंदिन गाड्यांची संख्या १५० आहे. यातील निम्म्या गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत. लोकल व नजीकच्या अंतरावरील गाड्या इतर स्थानकावर वळवल्या जातील. परंतु, लांब पल्ल्याच्या गाड्या इतर स्थानकांवर वळवता येणार नाहीत, कारण नजीकच्या कोणत्याही स्थानकाची एवढी क्षमता नाही. त्यामुळे या गाड्या पुणे रेल्वे स्थानकावरूनच सुरू राहतील, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : लोणी काळभोरमध्ये बैलगाडा शर्यतीत दुर्घटना; स्टेज कोसळून एकाचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हडपसर, शिवाजीनगरचा पर्याय तोकडा

लोकल, इंटरसिटी आणि जवळच्या अंतरातील गाड्या हडपसर, शिवाजीनगर आणि खडकी स्थानकावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे फलाट विस्तारीकरणाच्या काळात प्रवाशांना पुणे स्थानकाऐवजी हडपसर, शिवाजीनगर आणि खडकी स्थानकांवरून प्रवास करावा लागणार आहे. या दोन्ही स्थानकांची क्षमता कमी असल्याने तेथून गाड्या सोडण्यावर मर्यादा आहेत. यामुळे पुण्याच्या जवळच्या शहरांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.