पुणे : ‘जेईई’ मार्गदर्शनासाठी खासगी शिकवणीवर्ग अचानक बंद करून ३१ विद्यार्थ्यांकडून ४५ लाख रुपये शुल्क घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एका संस्थाचालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत बरकत कादरी (वय ४८, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ जून २०२४ ते २९ मे २०२५ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वारगेटमध्ये ‘जेईई’ मार्गदर्शन वर्ग सुरू केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन, तसेच रोख स्वरूपात एक वर्षाचे शुल्क घेतले होते. तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाच्या प्रवेशासाठी सुरुवातीला २८ हजार ८०० रुपये दिले. त्यानंतर ७५ हजार ३०० रुपये भरले होते.
मार्गदर्शन वर्गात ३० विद्यार्थ्यांनी पैसे भरले होते. मात्र, अचानक आरोपींनी पालकांची ‘ऑनलाइन मीटिंग’ घेऊन वर्ग बंद केल्याचे सांगितले. पालकांनी शुल्काबाबत वारंवार मेलद्वारे विचारण केली, तसेच शुल्क परत देण्याची मागणी केली. शुल्क परत न देता एकूण ३१ पालकांची ४५ लाख २३ हजार रुपयांना फसवणूक केली. स्वारगेट पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.