पुणे : मुकुंदनगर भागातील एका मंदिरातील दानपेटी फोडून ३८ हजारांची रोकड चोरून पसार झालेल्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून ३८ हजार ४०० रुपये, तसेच कटावणी जप्त करण्यात आली.

महादेव तुकाराम गिरमकर (वय ४२, रा. कवठा, विकासवाडी, ता. श्रीगोंदा, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. स्वारगेट भागातील मुकुंदनगर परिसरातील एका मंदिराचा दरवाजा तोडून दानपेटीतील ३८ हजारांची रोकड चोरून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. स्वारगेट पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. चित्रीकरणात संशयित चोरटा दिसून आला होता.

चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. चित्रीकरणातील चोरट्याचा वावर स्वारगेट एसटी स्थानक परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गिरमकरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरल्याची कबुली दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल काेलंबीकर, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, शैलेश आलाटे, शंकर संपते, सागर केकाण, अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, सुजय पवार, संदीप घुले, फिरोज शेख, रमेश चव्हाण यांनी ही कामगिरी केली.