पुणे : बिबवेवाडी, कोंढवा भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून पाच लाख २० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली.कोंढवा बुद्रुक भागातील श्रीकुंज सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी २० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा चार लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढवा भागात राहायला आहेत. त्यांची आई आणि बहीण व्हीआयटी महाविद्यालयाजवळ असलेल्या श्रीकुंज सोसायटीतील सदनिकेत राहायला आहेत.

चोरट्यांनी १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री बंद सदनिकेचे कुलूप तोडून रोकड, तसेच सोन्याचे दागिने असा चार लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. श्रीकुंज सोसायटीतील आणखी एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दोन हजारांची रोकड, मोबाइल संच, चांदीच्या वस्तू असा १३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक विजय महाडीक तपास करत आहेत.

बिबवेवाडीतील पोकळे वस्ती भागात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७० हजारांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक चोपडे तपास करत आहेत.

दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरी

सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना नऱ्हे आणि खराडी भागात घडल्या. या प्रकरणी खराडी आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात वाल्हेकर चौकात असलेल्या भक्ती राधिका अपार्टमेंटमधील एका सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने कपाटातील ४७ हजार ५०० रुपयांचे दागिने लांबविले. याबाबत एका तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस कर्मचारी उत्तम तारु तपास करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत खराडी भागातील थिटे वस्ती परिसरात असलेल्या कृपा सोसायटीतील सदनिकेतून चोरट्यांनी १८ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा ९९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एका महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस कर्मचारी बुधवंत तपास करत आहेत.