पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला. वेगवेगळ्या घटनेत दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांकडील तीन लाखांचे दागिने चोरुन नेले. धनकवडी, बिबवेवाडी, वानवडी परिसरात या घटना घडल्या.

धनकवडी परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख २० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला धनकवडीतील चैतन्यनगर परिसरात राहायला आहेत. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास त्या धनकवडीतील त्रिमूर्ती चौकातून निघाल्या होत्या. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने दुचाकीस्वार आडवा आला. दुचाकीस्वाराबरोबर असलेल्या साथीदाराने महिलेच्या गळ्यातील एक लाख २२ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरुन नेले. चोरलेले मंगळसूत्र साडेतीन तोळे असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.

हेही वाचा – शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर?

वानवडीतील लष्करी रुग्णालयाजवळ दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील एक लाख २० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वानवडी भागात राहायला आहेत. मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास त्या दुचाकीवरुन लष्करी रुग्णालयाच्या परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या चोरट्यांनी दुचाकीस्वार महिलेला अडवले. चोरट्यांनी दुचाकी आडवी लावली. महिलेच्या गळ्यातील एख लाख २० हजारांचे मंगळसूत्र चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करत आहेत.

बिबवेवाडीतील सुखसागरनगर परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मैत्रिणीसोबत मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास सुखसागरनगर परिसरातून निघाल्या होत्या. दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र चोरले. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

हेही वाचा – पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ

शहरात गेल्या काही महिन्यांपासून पादचारी महिलांकडील दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. महिलांकडील दागिन्यांसह पादचाऱ्याकडील मोबाइल चोरुन नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. गेल्या वर्षी शहर, परिसरात जबरी चोरीचे १८० हून जास्त गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.