पुणे : भविष्यातील वाहन उद्योगाचे चित्र मांडणारा नेक्सजेन मोबिलिटी शो २०२५ पुण्यात होत आहे. वाहन उद्योगातील नवतंत्रज्ञानाचे सादरीकरण या निमित्ताने केले जाणार आहे. द कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) पश्चिम विभागाच्या वतीने मोशीतील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान नेक्सजेन मोबिलिटी शोचे आयोजन केले असून, या प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे.

सीआयआय पश्चिम विभागाच्या फ्युचर मोबिलिटी टास्क फोर्सचे अध्यक्ष व टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्सचे उपाध्यक्ष अरविंद गोयल यांनी याबाबत मंगळवारी पत्रकार परिषदेत घोषणा केली. ते म्हणाले, की इनोव्हेट, इंटिग्रेट, इम्पॅक्ट : द फ्युचर ऑफ मोबिलिटी या संकल्पनेंतर्गत हा उपक्रम वाहन उद्योगातील संपूर्ण मूल्यसाखळीला एकत्रित आणेल. यामध्ये व्यावसायिक वाहने, प्रवासी वाहने, धोरण आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वे, इलेक्ट्रिक वाहन व्यवसाय परिसंस्था विकास, शाश्वत चार्जिंग पायाभूत सुविधा, बॅटरी तंत्रज्ञान, ई-वाहन उत्पादन अभिनवता व गुंतवणूक, रॅपिड मेट्रो, हाय स्पीड ट्रेन, शहरी हवाई गतिशीलता आणि पायाभूत सुविधा विकास यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

सीआयआय, पुणे झोनल कौन्सिलचे अध्यक्ष आणि आरएसबी ट्रान्समिशन्स इंडियाचे कार्यकारी संचालक रजनिकांत बेहरा म्हणाले, की भारतीय वाहन उद्योग आता महत्त्वाच्या वळणावर असून, भविष्याला आकार देणारे अनेक प्रवाह दिसून येत आहेत. त्यामुळेच नेक्सजेन मोबिलिटी शो हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमात जागतिक पातळीवरील वाहन उद्योग सहभागी होतील. यामध्ये इंटर्नल कम्बशन इंजिन्स (आयसीई), इलेक्ट्रिक, हायब्रिड, सीएनजी/एलएनजी व इथेनॉल/बायोफ्युएल पॉवर ट्रेन्स, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सबसिस्टीम्स, मेकॅनिकल सबसिस्टीम्स, पारंपरिक व अद्ययावत वाहनांचे सुटे भाग आणि मोबिलिटीच्या भविष्याला चालना देणारे नवीन वाहन तंत्रज्ञान सादर केले जाईल.

सीआयआय पश्चिम विभागाच्या फ्युचर मोबिलिटी टास्क फोर्सचे सहअध्यक्ष आणि झेडएफ समूहाचे अध्यक्ष आकाश पास्सी म्हणाले, की या उपक्रमामुळे पुण्यातील व पश्चिम भारतातील व्यावसायिकांना अद्ययावत वाहन तंत्रज्ञानाबाबत माहिती मिळेल, तसेच वाहन उद्योगाला आकार देणाऱ्या उद्योग नेतृत्वाशी संवाद साधण्याची संधी मिळेल. विविध विषयांवरील तज्ज्ञांची सत्रे व महत्त्वपूर्ण चर्चांद्वारे सहकार्याला चालना देण्याचा उद्देश आहे.

ठळक वैशिष्ट्ये

  • ९ ऑक्टोबर : वाहन संशोधन व विकास परिषद
  • १० ऑक्टोबर : सॉफ्टवेअर आधारित गतिशीलता परिषद
  • ११ ऑक्टोबर : नवउद्यमी व संशोधन परिषद