पुणे : रिक्षांचे परवाने खुले केल्याने शहरात रिक्षांची संख्या सव्वा लाखाहून अधिक झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यावर उपाय म्हणून रिक्षांना परवाना देणे थांबवावे, अशी विनंती राज्य सरकारकडे करण्याचा निर्णय महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यांच्या समन्वय समितीच्या बैठक झाली. या बैठकीत शहरात नवीन रिक्षांना परवाना देणे थांबविण्यात यावे, अशी विनंती राज्य सरकारला करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनाेज पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे आदी उपस्थित होते.

याबाबत महापालिका आयुक्त राम म्हणाले, ‘शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. माेठे प्रकल्प हाती घेतले असताना वाहतूक कोंडीचा प्रश्न वाढत चालला आहे. पुण्यात दरवर्षी सुमारे चार लाख वाहने नव्याने रस्त्यांवर येत आहेत. याला प्रतिबंध करता येईल का? यावर बैठकीत चर्चा झाली. गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील रस्त्यांवर रिक्षांची संख्या माेठ्या प्रमाणावर वाढत आहे. रिक्षांचे परवाने खुले केल्याने रिक्षांची संख्या सव्वा लाखाहून अधिक झाली आहे.

रिक्षा परवान्यांवर निर्बंध आणणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पुण्यात नवीन रिक्षा परवाने देणे थांबावावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली जाणार आहे. ‘शहरातील ज्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणांवर आवश्यक ती उपाययोजना करण्यावर येणाऱ्या आगामी काळात भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. वाहतूक कोंडी होत असलेले शहरातील ३२ रस्ते, २२ चौकांमध्ये महापालिकेने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत’ असे राम यांनी स्पष्ट केले.

आठ मेट्रो स्थानकांजवळ वाहनतळासाठी जागा

‘अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे आढळून आले आहे. ज्या ठिकाणी रस्ते अरुंद आहेत तेथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. मेट्राे स्थानकाजवळील वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी आठ मेट्राे स्थानकांजवळ सार्वजनिक वापराचे आरक्षण असलेल्या जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत’ असे महापालिका आयुक्त राम यांनी सांगितले.

रस्त्यांवर वाहतुकीला अडथळे ठरणारे दिव्यांचे खांब हलविण्यात आले असून, अनेक वर्षांपासून रस्त्यावर पडून असलेली बेवारस वाहने हटविण्यात आली आहेत. अतिक्रमणे काढून टाकण्यात आली आहेत. या उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे’ -मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त

रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक रस्त्यांवर विजेचे खांब, बेकायदा जाहिरात फलक, वाहतुकीला अडथळा ठरणारे पाण्याचे व्हॉल्व्ह हटविण्यात आले आहेत. काही चौकांतील रस्ते रुंद करण्यात आले आहेत. – नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका