पुणे : मुंबई- बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे पुलाजवळ शुक्रवारी सकाळी अवजड कंटेनर बंद पडल्याने नवले पुलासह, सिंहगड रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या आवारातील बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी जाणारे राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह वाहनचालक वाहतूक कोंडीत अडकले होते.

बाह्यवळण मार्गावरून मुंबईकडे निघालेला कंटेनर वारजे पुलाजवळ सकाळी बंद पडला. वाहनचालक, तसेच नागरिकांनी तो एका बाजूला हलवण्याचा प्रयत्न केला. कंटेनर हलविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. या घटनेनंतर बाह्यवळण मार्गाच्या दोन्ही बाजूच्या वाहतूक कोंडी झाली. वारजे पुलापासून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे भागातील स्वामीनारायण मंदिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या, तसेच सिंहगड रस्त्यावरून वारजे पुलाकडे जाणारी वाहनेही कोंडीत अडकली. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.

केंद्रीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत कोंढवा परिसरात एका क्रीडा संकुलाच्या उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी निघालेले राजकीय पक्षाचे पदाधिकारी कोंडीत अडकले होते.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिमत जाधव यांच्यासह वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी, कर्मचारी वाहतूक नियोजनासाठी तैनात होते. वाहतूक कोंडीतू मार्ग काढल्यानंतर दोन क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेनच्या सहायाने कंटेनर बाजूला काढण्यात आला. त्यानंतर या भागातील वाहतूक पूर्ववत झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाह्यवळण मार्गावरील नवले पूल, तसेच वारजे पुलावर अपघाताच्या घटना घडतात, तसेच वाहने बंद पडतात. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत होते. वारजे परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय आहे.या कार्यालयाजवळ दोन क्रेन तैनात ठेवण्यात याव्यात, असे पत्र वाहतूक पोलिसांनी यापूर्वी दिले होते. मात्र, अद्याप क्रेन आणलेल्या नाहीत, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.