पुणे : पेशवे उद्यानाजवळ गुलमोहराचे झाड कोसळून रिक्षावर पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. दुर्घटनेत रिक्षाचालक जखमी झाला असून, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शुभदा यशवंत सप्रे (वय ७६, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सप्रे बुधवारी दुपारी रिक्षातून नातेवाईकांकडे निघाल्या होत्या. नीलायम चित्रपटगृहाजवळून रिक्षा पर्वती पायथ्याकडे निघाली होती. पेशवे उद्यानाच्या मागील बाजूस असलेले गुलमोहराचे झाड रिक्षावर पडले. रिक्षातील प्रवासी सप्रे गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सप्रे, तसेच रिक्षाचालक संजय अवचरे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सप्रे यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अवचरे यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

या घटनेची नोंद दत्तवाडी पोलिसांनी केली आहे. पेशवे उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर यापूर्वी झाडांच्या फांद्या कोसळल्या होत्या. मे महिन्यात शहरात २०० हून जास्त झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाब विचारायचा कोणाला?

कर्वेनगर भागात दोन दिवसांपूर्वीच झाड पडल्याने दुचाकीस्वार राहुल श्रीकांत जोशी (वय ४९, रा. कर्वेनगर) यांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांपूर्वी ओंकारेश्वर मंदिराजवळ झाड कोसळून अभिजित गुंड या बँक कर्मचारी तरुणाचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी बिबवेवाडीत झाड कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. घोले रस्ता परिसरात काही वर्षांपूर्वी झाड कोसळून एका अपंग महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या नातेवाईकांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांनी या प्रकरणी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याानंतर या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी उद्यान विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.