पुणे : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले. त्यात संशोधकांनी केलेल्या कामाचा मोठा वाटा आहे. मात्र, मराठ्यांच्या इतिहासावर इंग्रजीत प्रसिद्ध झालेले चांगल्या दर्जाचे संशोधन नाही. वारसा यादीतील समावेशाच्या प्रस्तावासमोर हे सर्वांत मोठे आव्हान होते,’ अशी माहिती पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी शुक्रवारी दिली.

इंद्रायणी साहित्य आणि इतिहास संस्कृती कट्टा यांच्या वतीने डॉ. गर्गे यांच्या हस्ते संदीप परांजपे संपादित ‘ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या – जिल्हे सातारा आणि कोल्हापूर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ गिर्यारोहक-लेखक वसंत वसंत लिमये, डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्व विभागाचे संशोधक डॉ. सचिन जोशी, संपादक परांजपे, प्रकाशक मुग्धा कोपर्डेकर या वेळी उपस्थित होते.

डॉ. गर्गे म्हणाले, ‘वास्तूकलेच्या दृष्टिकोनातून कित्येक किल्ले मराठ्यांचा वारसा म्हणून सांगणे कठीण होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला शिवनेरीसारखा किल्ला मराठ्यांपूर्वी बहमनी राजवटीत होता. अकादमिक अनुषंगाने तो मराठ्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणून दावा करणे कठीण होते. मात्र, जनकल्याणासाठी लढाई करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते. जगभरात सगळीकडे त्यांना आदराचे स्थान आहे. त्यांच्या वारशामुळेच या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समावेश मिळवून देणे शक्य झाले.’

‘मराठ्यांच्या इतिहासावर मराठीतून मुबलक लेखन झाले आहे. मात्र, एखादेच चांगले पुस्तक इंग्रजीत सापडते. आता जगासमोर आपला इतिहास न्यायचा असेल, तर मराठीबरोबरच इंग्रजीतही जास्तीत जास्त पुस्तके यायला हवीत. ती इंग्लंडमध्येही वाचली जातील. त्या वेळी छत्रपतींचा विचार सातासमुद्रापलीकडे पोहोचवता येईल. आपल्याला संशोधक म्हणून भविष्यात एकत्र राहूनच काम करावे लागेल. ज्या दिवशी संस्थात्मक पद्धतीने काम उभे राहील, तो दिवस मोठा असेल,’ असेही डॉ. गर्गे यांनी सांगितले.

लिमये म्हणाले, ‘संदर्भ ग्रंथ, सूची ग्रंथ या प्रकारातील साहित्यांत पायाभूत काम केले जाते. त्यासाठी अभ्यास असावा लागतो. आजच्या काळात पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, दुर्दैवाने इथला इतिहास लोकांपर्यंत पोहोचत नाही. आपला इतिहास पोहचवण्यासाठी रंजक, लोकप्रिय मार्गांचाही अवलंब करायला हवा.’

‘आपल्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अद्यापही शिवकालीन इतिहासाच्या खुणा गडकोटांवर आहेत. त्यामुळे किल्ल्यावर आपला इतिहास वाचून जायला हवे.’ असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

चिंतामणी केळकर यांनी सूत्रसंचालन केले. कोपर्डेकर यांनी आभार मानले.

सध्या आपण खरे बोलायलाही घाबरतो आहे. समाजमाध्यमांमधून विषय अधिक भडकपणे मांडण्याची परंपराच निर्माण झाली आहे. लोकांना केवळ मनोरंजन आणि भडक आशय हवा आहे. त्यातून इतिहासाचा विपर्यास काढला जाण्याची शक्यता अधिक असते. – डॉ. तेजस गर्गे, संचालक, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.