पुणे : शनिपार चौकातील पदपथावर भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या चरण नामदेव वनवे यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशातून मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल १ लाख १३ हजार ७४० रुपयांचे दान दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. आमदार हेमंत रासने या वेळी उपस्थित होते. राज्यावर संकट येते तेव्हा सामान्य माणूसही मदतीचा हात पुढे करतो याचा वस्तुपाठ वनवे यांनी घालून दिला.
वनवे हे शंकर महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. बिबवेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या वनवे यांनी घरामध्ये शंकर महाराजांच्या पादुकांसमोर एक डबा ठेवला आहे. भाजी विक्रीतून आलेल्या रकमेपैकी दररोज शंभर रुपये ते या डब्यामध्ये साठवतात. आपदग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने केलेली बचत शनिवारी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आली.
वनवे म्हणाले, ‘आमची तिसरी पिढी भाजी विक्रीचा व्यवसाय करते. माझ्या आईने करोनाच्या काळात गरजवंतांना एक लाख रुपयांची मदत केली होती. आपल्याकडील पैसा हा इतरांच्या कामाला यावा अन्यथा तो दुःखाचा डोंगर आहे, अशी आईची शिकवण होती. तिच्या पश्चात मी हा वारसा पुढे नेत आहे याचा आनंद वाटतो. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने दररोज शंभर रुपये बाजूला ठेवतो. समाजाची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार मी खारीचा वाटा उचलला आहे.’
रासने म्हणाले, ‘सामान्य परिस्थिती असूनही आपण समाजाचे काही देणे लागतो या नात्याने वनवे यांनी केलेली मदत लाख मोलाची आणि समाजाला प्रेरित करणारी आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने कसबा मतदार संघातील अभियानाचा आम्ही यानिमित्ताने शुभारंभ केला. अधिकाधिक नागरिकांनी पूरग्रस्तांना मदत करावी.’