पुणे :ऑनलाइन पूजेच्या आमिषाने एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे घोरपडी परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर १७ जून रोजी संपर्क साधला. एका देवस्थानात देवीची पूजा करण्यात येणार आहे. भक्तांना या पूजेत सहभागी होता येणार असून, त्यासाठी काही रकम जमा करावी लागेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केली. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून चोरट्यांनी तक्रारदाराकडून पाच लाख ३० हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने तपास करत आहेत.
आणखी एकाची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची पाच लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे आंबेगावमधील जांभुळवाडीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी तक्रारदारांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर तक्रारदारांनी चोरट्यांच्या खात्यात सुरुवातीला काही रकम गुंतविली.
रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा दिल्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रकम गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पाच लाख ५६ हजार रुपये जमा केले. रकम जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही, तसेच मुद्दलही दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत.