पुणे : पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी खडकवासला धरणातून सुरू असलेल्या विसर्गात सोमवारी वाढ करण्यात आली. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या परिसरात पुराचे पाणी शिरले. नदीपात्रातील रस्त्यासह भिडे पूलही पाण्याखाली गेला असून नदीकाठ परिसरातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या वर्षीसारखी पूरपरिस्थिती उद्धभवू नये, यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दीड महिन्यापासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. या साखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने पानशेत आणि वरसगाव धरणे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. ही दोन्ही धरणे पाणीसाठ्याच्या दृष्टीने मोठ्या क्षमतेची असून त्या तुलनेत लहान असलेले खडकवासला धरणही ऐंशी टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी खडकवासला धरणातून रविवारपासून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे.
खडकवासला धरणातून रविवारी सायंकाळी १८ हजार ४८३ क्युसेक एवढा विसर्ग सुरू होता. हा विसर्ग सोमवारी दुपारी २५ हजार ६९६ एवढा करण्यात आला. मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर येवा येत असल्यामुळे सायंकाळी सात वाजता त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तो २८ हजार ६६२ क्युसेक करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार तसेच येव्यानुसार विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
महापालिकेकडून पथके तैनात
खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतचा इशारा देण्यात आला आहे. विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने महापालिकेकडून पथके तैनात करण्यात आली आहेत. विशेषत: सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगरी, विठ्ठलवाडी येथील नदीकाठच्या अनेक सोसायट्यांना सावध राहण्याची सूचना करण्यात आली. महापालिकेकडून साहाय्यता कक्षही स्थापन करण्यात आला आहे.