पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कचे रूपांतर ‘वॉटर पार्क’मध्ये होण्यामागे मानवनिर्मित कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासकीय यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणात आयटी पार्कमध्ये १५ ठिकाणी जलप्रवाह अडवून त्यांवर कंपन्यांसह व्यावसायिक संकुले व गृहनिर्माण संकुले उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची भूमिका घेतली आहे.

हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये पाऊसकाळात जलकोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. आयटी पार्कच्या परिसरात हिंजवडी, माण, मारुंजीतील रस्त्यांवर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते आहे. याला नैसर्गिक जलप्रवाहांवरील अतिक्रमणे कारणीभूत असल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला होता. त्यामुळे या समस्येचे मूळ जाणून घेण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने नुकतेच आयटी पार्कमधील नैसर्गिक प्रवाहांचे सर्वेक्षण केले.

आयटी पार्कमध्ये डोंगरावरून खाली येऊन नदीत मिसळणारे ओढे आणि नाले १५ ठिकाणी रोखण्यात आल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले. त्या ठिकाणी मोठी बांधकामे झाली आहेत. या बांधकामांवर कशी कारवाई करायची, असा तिढा आता निर्माण झाला आहे. कंपन्या, व्यावसायिक संकुले आणि गृहनिर्माण संकुलांवर कारवाई करावयाची झाल्यास ती पाडावी लागतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याऐवजी या बांधकामांसाठी अडविण्यात आलेल्या नैसर्गिक प्रवाहांना पर्यायी मार्ग काढून देण्याचा विचार ‘पीएमआरडीए’कडून सुरू आहे. मात्र, यामुळे समस्या कायमस्वरूपी सुटणार नसल्याचा स्थानिक रहिवाशांचा दावा आहे.

‘पीएमआरडीए’च्या सर्वेक्षणात जलप्रवाह अडविण्यात आल्याची १५ ठिकाणे उघडकीस आली. या बांधकामांना दिलेल्या परवानग्या तपासण्यात येत आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक प्रवाहांना वाट काढून देण्यासाठी या १५ ठिकाणी दीर्घकालीन उपाययोजना हाती घ्याव्या लागणार आहेत. मुख्यमंत्री हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असल्याने त्यांच्याकडेही याबाबत अहवाल सादर केला जाणार आहे.

डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

आयटी पार्कमधील समस्यांसाठी नागरिकांना एमआयडीसी, महापालिका, मेट्रो, पीएमआरडीए, महावितरण, पोलीस या विभागांकडे वारंवार पाठपुरावा करावा लागतो. यामध्ये त्यांचा वेळ जातो. हे टाळण्यासाठी राजीव गांधी आयटी पार्क, माण, मारुंजी या भागांचा समावेश असणारे एक स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची गरज आहे. त्यावर सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रिया सुळे, खासदार