पुणे : महापालिकेच्या पर्वती जलकेंद्रातील विद्युत यंत्रणेत रविवारी मध्यरात्री बिघाड झाल्याने या जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या शहरातील मध्यवर्ती पेठांसह सहकारनगर, पर्वती, बिबवेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सोमवारी विस्कळीत झाला.
रविवारी मध्यरात्री पर्वती जलकेंद्राला वीजपुरवठा करणारी केबल शॉर्ट सर्किटमुळे जळाली. त्यामुळे जलकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाला. परिणामी पाणीपुरवठा बंद राहिला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. सकाळी दहा वाजता जलकेंद्र सुरू झाले. मात्र, गरजेपेक्षा कमी पाणी असल्याने मध्यवर्ती पेठांमधील पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. उर्वरित पंपिंग स्टेशनपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब झाला.
नागरिकांच्या मागणीनुसार काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी दिली. जलकेंद्रातील तांत्रिक दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. मात्र, इतर भागांत पाणी मिळाले नाही.