पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत मेफेड्रोन (एमडी) विक्री प्रकरणात कुंटणखाना मालकिणीला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गजाआड केले. कुंटणखाना मालकिणीने वेश्यावस्तीतील महिला, तसेच तरुणांना मेफेड्रोनची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ज्योती सुनील यादव ऊर्फ कट्टीमणी (वय ५०, रा. कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या कुंटणखाना मालकिणीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी बुधवार पेठेतील बाटा गल्लीत ज्योतीचा भाऊ शरणप्पा नागाप्पा कटिमणी (वय ३४, रा. दुगड शाळेजवळ, कात्रज, मूळ रा. भापर गल्ली, गुलबर्गा, कर्नाटक) याला मेफेड्रोन विक्री प्रकरणात अमली पदार्थविराेधी पथकाने अटक केली होती. शरणप्पा याला मेफेड्रोन कोणी दिले, तसेच त्याने कोणाला विक्री केली, याबाबत तपास करण्यात येत होता. शरणप्पाची बहीण ज्योती ही कात्रजमध्ये वास्तव्यास आहे. ती बुधवार पेठेत कुंटणखाना चालवायची. ज्योती ही कुंटणखान्यात येणारे तरुण, तसेच वस्तीतील महिलांना मेफेड्रोनची विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिला अटक केली.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, चेतन गायकवाड, संदीप शेळके, अझिम शेख, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझाद पाटील, नीलम पाटील, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.