पिंपरी : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत संलग्न केलेली मालमत्ता एका महिलेने चार कोटी ८४ लाखांना परस्स्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शासनाच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील निघोजे गाव येथे फेब्रुवारी महिन्यात घडला.
याबाबत ईडीच्या सहायक निदेशकांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील ४४ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोजे येथील एक भूखंड ईडीने कायदेशीर आदेशाद्वारे संलग्न केला होता. आरोपी महिलेला या संलग्नतेची लेखी आदेशाद्वारे माहिती दिली होती. तरीही आरोपी महिलेने शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ही मालमत्ता चार कोटी ८४ लाख ३८ हजारांना परस्पर विक्री केली. त्याबाबत खेड येथील सहनिबंधक कार्यालयात विक्री करारनामा करण्यात आला आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
फलक लावण्यावरुन तरुणावर कोयत्याने वार
फलक लावण्यावरून झालेल्या बाचाबाचीतून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना रामनगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर ऊर्फ सम्या उत्तम गवळी (वय १९, रा. काळेवाडी), मोन्या ऊर्फ शशांक अनंत लांडगे (वय १९, रा. मस्के वस्ती, रावेत), शिवा बाबासाहेब बनसोडे (वय १९, रा. आंबेडकरनगर, चिंचवड) यांना अटक केली असून त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाची दोन-तीन दिवसांपूर्वी आरोपींशी फलक लावण्यावरून बाचाबाची झाली होती. या कारणामुळे आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानुसार आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता व पालघन सारखे हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
बस चालकावर कोयत्याने वार
दुचाकीला जाण्यास जागा न दिल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून एका बस चालकाला मारहाण केली आणि कोयत्याने हल्ला करून जखमी केले. ही घटना तळेगाव-चाकण रोडव घडली. याप्रकरणी गणेश रामेश्वर हारदे (वय २४, रा. चाकण) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश जळबा बिजले उर्फ जब्या (वय २१, रा. बालाजीनगर, चाकण), शुभम सोमेश्वर मुंगळे उर्फ शुभ्या वाय झेड (वय २१, रा. नाणेकरवाडी) या दोघांना अटक केली असून त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी बस घेऊन जात असताना आरोपींनी त्यांच्या मोटारीला साईड न दिल्याच्या कारणावरून बस अडवली. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत लाकडी दांडक्याने मारहाण केली. आरोपी अविनाश याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. फिर्यादीने हात मध्ये टाकल्याने त्यांच्या डाव्या हाताच्या तीन बोटांना दुखापत झाली. आरोपींनी कोयता-दांडके हवेत फिरवून दहशत निर्माण केली. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
कोयत्याच्या धाकाने लूटमार, वाहनांची तोडफोड
कोयत्याचा धाक दाखवून एका व्यक्तीकडून पैसे जबरदस्तीने काढले आणि तीन वाहनांची तोडफोड करून दहशत माजवल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना चिंचवड येथील अजंठानगरमध्ये घडली. याप्रकरणी संजय इंद्रजीत धेंडे (वय ५०, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिष ऊर्फ काळया मुकेश राऊत (वय २०, रा. अजंठानगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीकडून ८५० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याबाबत विचारणा केली असता त्याने कोयत्याने फिर्यादींची मोटार, एकाची ऑटो रिक्षा आणि एक जणाचा टॅम्पो या तीन वाहनांच्या काचा फोडून अंदाजे दहा हजारांचे नुकसान केले. आरोपीने कोयता हवेत फिरवून शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
मुंबई-पुणे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर ‘हिट अँड रन’
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी किवळे येथे घडली. भगवान सिंग असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी २० वर्षीय तरुणाने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञान वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र भगवान सिंग हे क्रिकेटचे मैदान पाहण्यासाठी पायी चालत जात होते. त्यावेळी फिर्यादी हे लघुशंकेसाठी रस्त्याच्या बाजूला गेले. त्यांचा मित्र रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी अज्ञात वाहन चालकाने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भगवान सिंग यांना धडक दिली. त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. रावेत पोलीस तपास करत आहेत.