सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. दुमजली उड्डाणपुलावरील मेट्रो मार्गिका, उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची ही सर्व कामे दोन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे नागरिक आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा >>> पुणे : मिळकत नावावर करण्यासाठी लाच घेताना निरीक्षक जाळ्यात

पुणे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या वतीने करण्यात आलेल्या सादरीकरणावेळी उड्डाणपुलाचे काम सप्टेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाची रचना चुकल्यामुळे उड्डाणपूल पाडण्यात आला आणि त्याऐवजी दुमजली उड्डाणपूल बांधण्यास मान्यता देण्यात आली. दुसऱ्या मजल्यावर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिका आणि त्याखालील मार्गिकेमध्ये खासगी वाहने असे नियोजन करण्यात आले आहे. मात्र सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मेट्रोसाठीच्या खांबांची उभारणी सध्या सुरू असून काम सुरू असताना दहा ते पंधरा मिनिटाच्या प्रवासाला तब्बल दीड दोन तास लागत आहेत. त्यामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर आणखी भर पडणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करोना टाळेबंदीच्या काळात अस्तित्वातील उड्डाणपूल पाडून नव्याने मेट्रोसह दुमजली पुलाच्या उभारणीसाठी पायाभरणी करण्यात आली. सर्वात वरच्या स्तरावरून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग, त्याखाली वाहनांसाठी पुल व त्याखाली ४५ मीटरचा रस्ता अशा दुमजली उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर पासून मेट्रो मार्गिकेचे सुरू झाले असून २०२५ पर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

हेही वाचा >>> पुणे-लोणावळा रेल्वेत टीसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

औंध, पाषाण, औंधकडे जाण्यासाठी दुमजली उड्डाणपुल उपयुक्त ठरणार आहे. महापालिकेकडून या मार्गावर विद्यापीठ चौकातून औंधकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्यात येईल. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राधेकृष्ण रस्ता, संचेती चौक आणि अभिमान श्री (पाषाण रस्ता सकाळनगर यांना जोडणाऱ्या रस्त्यावर) वळण येथे एक असे चार भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. पीएमआरडीएकडून होणाऱ्या उड्डाणपूलाच्या कामासह महापालिकेने हे कामही समांतर करण्याचे नियोजन केले असून, ही दोन्ही कामे वेळेत झाली तर ती जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उड्डाणपुलासाठी २७७ कोटींचा खर्च
विद्यापीठ रस्त्यावर दुमजली उड्डाणपूलासाठी २७७ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. टाटा प्रोजेक्ट कपंनीकडून तो उभारण्यात येईल. दुमजली उड्डाणपूलाची लांबी ८८१ मीटर इतकी आहे. उड्डाणपुलावरून औंधकडे जाण्यासाठी २६० मीटरच्या दोन मार्गिका, बाणेरकडे जाण्यासाटी १४० मीटरच्या चार मार्गिका तसेच पाषाणकडे जाण्यासाठी १३५ मीटरच्या दोन मार्गिका असतील. उड्डाणपुलाखालील ४५ मीटर रूंदीच्या रस्त्यावर जागोजागी वळण्यासाठी सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी सिग्नल विरहीत मार्गिका असेल.