पुणे : पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेने यंदा विशेष ‘टॉयलेट सेवा’ मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
तंत्रज्ञान आधारीत या ॲपच्या माध्यमातून वारी मार्गावरील फिरती शौचालये आणि त्यांची स्वच्छता यांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. पालखी मार्गावर विविध ठिकाणी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यानुसार श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर १ हजार ८०० शौचालये तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर १हजार २०० शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच श्री संत सोपान महाराज पालखी मार्गावर ३०० शौचालयांची सुविधा आहे. या शौचालयांच्या व्यवस्थापनासाठी विशेष मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून, या ॲपच्या माध्यमातून विविध सेवा उपलब्ध होणार आहेत.
या सुविधा मिळणार
शौचालयाची उभारणी आणि स्थिती कळणार असून स्वच्छतेची माहिती मिळणार आहे. शौचालयाच्या ठिकाणी असलेली पाणी, वीज, रस्ता आणि साफसफाईची माहितीही उपलब्ध होणार असून शौचालयाचा वापर किती झाला याचा तपशील प्राप्त होणार आहे. नागरिकांना प्रतिक्रिया किंवा सूचना नोंदविता येतील. प्रत्येक शौचालयावर क्यूआर कोड स्कॅनर लावण्यात आले आहेत. गुगल स्कॅनर वापरून हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास संबंधित शौचालयाची माहिती मोबाईलवर मिळणार आहे. भाविकांनी या ॲपचा वापर करून सुविधा आणि स्वच्छतेबाबत आपली मते नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
जिल्हा परिषदेचा हा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत वारकऱ्यांच्या सेवेत एक महत्त्वाची भर घालणार आहे. – गजानन पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद