पुणे : इंधन खर्चात होणारी बचत, पर्यावरणपूरक असलेल्या ‘काॅम्प्रेस्ड नॅचरल गॅस’ (सीएनजी) आधारित वाहनांकडे पुणेकरांचा कल वाढत आहे. शहरातील ‘सीएनजी’ वाहनांची संख्या तीन लाखांहून अधिक झाली आहे. वर्षभरात सुमारे ४३ हजार सीएनजी वाहनांची भर पडली आहे. ‘सीएनजी’ वाहनांमध्ये मोटारींची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, ‘सीएनजी’ दुचाकींना अल्प प्रतिसाद असल्याचे निदर्शनास आले आहे.

सीएनजी वाहनांमध्ये मोटारींचे प्रमाण जास्त असून, एक लाख ३२ हजार मोटारी आहेत. त्यापाठाेपाठ प्रवासी रिक्षांची संख्या एक लाख २४ हजार आहे. मात्र, दुचाकींची संख्या अवघी १,३६१ असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) नोंदणीतून स्पष्ट झाले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती; तसेच प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक म्हणून सीएनजी वाहनांना अधिक पसंती मिळत आहे. सीएनजीआधारित वाहने जास्त अंतर पार करत असल्याने वाहनचालकांचा कल या वाहनांकडे आहे.

वाहन प्रकार – संख्या

  • मोटार – १,३२,५३६
  • रिक्षा – १,२४,४२२
  • मोटार कॅब – २९,२२७
  • मालवाहू चारचाकी – १२,५४८
  • तीनचाकी (मालवाहू) – ३,६३५
  • बस – ३,०००
  • दुचाकी – १,३६१
  • एकूण – ३,०६,७५६

वर्षभरातील वाढता आलेख

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पुण्यात ४३,५२७ सीएनजी वाहनांची नोंद झाली आहे. यामध्येही सर्वाधिक १९,५८६ मोटारी, ११,७८१ रिक्षा, ७,६६३ मोटार कॅब आणि २,५७७ मालवाहू चारचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. १,०८२ दुचाकी, तीनचाकी मालवाहू ६९४, तसेच १२२ बसची नोंदणी झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेट्रोल, डिझेल यांना पर्याय म्हणून नागरिक ‘सीएनजी’ वाहनांचा वापर करत आहेत. ही वाहने इंधन बचतीबरोबरच पर्यावरणपूरकदेखील आहेत. – विनायक साखरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.