पुणे : महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची शहरातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून इच्छा असताना, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, ‘पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्यानुसार निवडणुका होतील,’ असे स्पष्ट केले.
शहरातील पावसाळापूर्व कामांची माहिती घेण्यासाठी राज्यमंत्री मोहोळ यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांसह विविध विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोहोळ म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस पुण्यात होते. त्यांनी महायुती म्हणून निवडणूक लढविणार आहोत; अपवादात्मक स्थितीत स्वतंत्र लढू असे सांगितले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक कशी लढवायची, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. मात्र, निवडून येण्याचा निकष लावला जाणार आहे.’
शहरात भाजपची ताकद मोठी असून, गेल्या निवडणुकीत शंभर नगरसेवक विजयी झाले होते. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या (ठाकरे) पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबरोबर महायुतीत निवडणूक लढवायची झाल्यास १०५ जागा सोडून उर्वरित जागांवर चर्चा करावी, अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांची आहे.