पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संमतिपत्रे दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणीप्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी पोलीस बंदोबस्तामध्ये मुंजवडी, खानवडी आणि एखतपूर या गावांतील ५० हेक्टर जमिनीची मोजणीप्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तीन आठवडे ही प्रक्रिया सुरू राहणार असून, आवश्यकता भासल्यास मोजणीसाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. सात गावांतील मोजणीसाठी पाच पथके स्थापन करण्यात आली आहेत.
पुरंदर तालुक्यातील तीन गावांमध्ये भूसंपादन समन्वयक डॉ. कल्याण पांढरे, पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तसेच भूसंपादन अधिकारी संगीता राजापूर- चौगुले या अधिकाऱ्यांनी संबंधित गावांमध्ये मोजणीची प्रक्रिया शुक्रवारी सकाळपासून सुरू केली. तीन गावांतील शेतकऱ्यांनी पथकांना मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यास सहकार्य केले. त्यामुळे दिवसभरात ५० हेक्टर जागेची मोजणी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
मोजणीप्रक्रिया २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मोजणीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दरनिवाडा निश्चित करून शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला आणि परताव्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर थेट भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.दरम्यान, विमानतळासाठी पारगाव, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी अशा सात गावांमधून जमीन संपादित होणार आहे.
विमानतळासाठी एकूण तीन हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून संमतिपत्रे स्वीकारण्यास जिल्हा प्रशासनाने २५ ऑगस्टपासून प्रारंभ केला होता. ही मुदत गुरुवारी (२५ सप्टेंबर) संपुष्टात आल्याने शुक्रवारपासून प्रत्यक्ष मोजणीप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. संमतिपत्रे देण्याच्या कालावधीत ३ हजार २२० शेतकऱ्यांनी २ हजार ८१० एकर जागेचे संपादन करण्यासंदर्भातील संमतिपत्रे सादर केली आहेत.
पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील मोजणीप्रक्रियेला शुक्रवारी सुरुवात झाली. पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, पुढील २५ दिवस मोजणीप्रक्रिया सुरू राहील. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी