केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांची माहिती
पुरंदर येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत आहे. या प्रकल्पात भूसंपादन हा कळीचा मुद्दा असून नवी मुंबईच्या विमानतळाच्या भूसंपादनाच्या वेळी आलेल्या अडचणी लक्षात घेऊन पुरंदर येथील विमानतळासाठी भूसंपादन करताना अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे. विमानतळाचे काम सुरु होईपर्यंत विकास आराखडा तयार करुन त्यालगत शीतगृह, माल ठेवण्यासाठी गोदामे तसेच विमानतळाच्या भागातील रस्ते व पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचे जाळे उभे करणे आवश्यक आहे. या पाश्र्वभूमीवर पुरंदर येथील विमानतळासाठी पाच वर्षांचा कालावधी लागेल, अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सोमवारी दिली.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्यावतीने आयोजित व्याख्यानात त्यांनी पुरंदर, नवी मुंबई विमानतळ आणि त्यांच्याशी संबंधित पायाभूत सुविधांबाबत भाष्य केले. सिन्हा म्हणाले,‘ नवी मुंबई येथील विमानतळ करणे हे आव्हानात्मक काम आहे. या विमानतळासाठी भूसंपादन करताना अनेक अडचणी येत आहेत. त्याचबरोबर तेथील विमानतळ डोंगराळ व सखल अशा दोन्ही भागात होत असल्याने जमीन सपाटीकरणासाठी वेळ लागत आहे. या विमानतळापासून मुंबईपर्यंत लोकल व अन्य वाहतूक व्यवस्थेचे जाळे निर्माण करणे व ते विस्तारणे आवश्यक आहे. ट्रान्स हार्बर रेल्वे लाईनचे काम सन २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी सन २०२० किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कायम राहणार असून तेथे हवाई वाहतुकीचा खोळंबा झाल्यास त्याचा परिणाम देशातील इतर अनेक विमानतळांवर होऊ शकतो.’
पुण्याच्या सध्याच्या (लोहगाव) विमानतळावरच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. या विमानतळाच्या विकासासाठी हवाई दलाने आणखी जागा दिली असून त्या जागेवर नवे टर्मिनल उभारण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तसेच या जागेमुळे वाहनतळ व वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले.