जेजुरी : पुरंदर तालुक्यात झेंडूची शेती बहरली असून, खंडेनवमी आणि दसरा सणासाठी शेतकऱ्यांनी शेतात झेंडूची फुले राखून ठेवली आहेत. घटस्थापनेच्या दिवशी झेंडूला ४० ते ५० रुपये भाव मिळाला. दसऱ्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली आहे. मात्र, पावसामुळे झेंडू पिकाचे नुकसान होत आहे. बाजारपेठेत झेंडूची आवक कमी झाल्यास झेंडूला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

पुरंदर तालुक्याच्या विविध भागांत शेतकरी पूर्वीपासून गोंडा या वाणाचे उत्पादन घेतात. आता नवीन सुधारित वाण आले आहेत. कोलकता, यलो गोल्ड, ऑरेंज गोल्ड, अंबर यलो या वाणांचेही उत्पादन घेण्यात येत आहे. यंदा तालुक्यात पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली आहे. मागील वर्षी झेंडूला १० ते २० रुपये किलो भाव मिळाला. मात्र, या वर्षी झेंडूला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

जेजुरीत पूर्वी दसऱ्याला दोन दिवस मोठा झेंडू बाजार भरायचा. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल व्हायची. मात्र, आता राज्याच्या विविध भागांत झेंडूची लागवड होत असल्याने तेथून थेट पुणे आणि मुंबईतील बाजारपेठेत झेंडूची फुले पाठविली जातात. त्यामुळे येथील झेंडू बाजारावर परिणाम झाला आहे. गणेशोत्सवात दहा दिवस झेंडूच्या फुलांना ८० ते ९० रुपये किलो भाव मिळाला होता. घटस्थापनेच्या दिवशी ४० ते ५० रुपये किलोने झेंडूची विक्री झाली. मात्र, दोन दिवसांपूर्वी बेंगलोर येथून पुणे आणि मुंबईला झेंडूची आवक झाल्याने झेंडूचा भाव पडला. १० रुपये किलोने दोन दिवस झेंडूची विक्री झाली.

पुरंदर तालुक्यातील आंबळे, राजेवाडी, पिसर्वे, चांबळी, भिवरी, कोडीत, गराडे, सोमरडी, दौंडज, वाल्हे, कोळविहिरे या भागात झेंडू, बिजली, शेवंती आदी फुलांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाने काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तरीसुद्धा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात झेंडू बाजारपेठेत विक्रीसाठी जाईल, असे बेलसर येथील शेतकरी देवानंद जगताप आणि सलीम मुजावर यांनी सांगितले.