लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : थिरकणाऱ्या व्हीलचेअर्स… रसिकांच्या टाळ्यांचा निनाद… दिव्यांग कलाकारांकडून सादर करण्यात आलेला अद्भूत अविष्कार…. भरतनाट्य, कथ्थक नृत्याची जुगलबंदी…. सुफी नृत्य… मार्शल आर्ट… यांचा सुरेख मिलाफ असणारे विलोभनीय नृत्य…. हे पाहताना उपस्थितांच्या अंगावर उमटलेले शहारे आणि नकळत आलेले डोळ्यांत पाणी… या सर्वांचा अद्भूत संगम असलेला अविश्वसनीय असा ‘मिरॅकल ऑन व्हील्स’ या रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

अपंग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणत त्यांच्या उत्कर्ष आणि विकासासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी १७ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र येथे ‘पर्पल जल्‍लोष’ हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या महाउत्सवाचे उद्घाटन शुक्रवारीउत्साहात पार पडले. त्यानंतर मिरॅकल ऑन व्हील्स’ हा सांस्कृतिक कार्यक्रम पर्पल जल्लोष महोत्सवामध्ये सादर करण्यात आला.

आणखी वाचा-सिंहगड रस्त्यावर चंदन चोरी करणारा गजाआड

‘मिरॅकल ऑन व्हील्स’ कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर शिवनृत्य, भरतनाट्य, कथ्थक जुगलबंदी सादर करण्यात आली. यावेळी अपंग बांधवांनी हनुमान चालिसा नृत्य करीत त्या माध्यमातून रामायणातील प्रसंग दाखवला. तसेच काळजाचा ठेका चुकवणारे मार्शल आर्ट्सवरील नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. ख्वाजा मेरे ख्वाजा या प्रसिद्ध गाण्यावर सादर करण्यात आलेल्या सुफी नृत्याने रसिकांची मने जिंकली. राष्ट्रभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करीत उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृती केली. हा सांस्कृतिक कार्यक्रम आत्मविश्वासाने सादर करीत एकप्रकारे आम्ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे दिव्यांग कलाकारांनी दाखवून दिले. या कार्यक्रमाचे निर्माते-दिग्दर्शक डॉ.सय्यद पाशा यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन करून व्हील चेअरवरील नृत्याच्या अविष्काराबाबत पार्श्वभूमी सांगून कलाक्षेत्रात दिव्यांगांचे सुद्धा विशेष स्थान असून त्यांच्यामधील आत्मविश्वास रसिकांनी दाद आणि प्रोत्साहन देऊन तेवत ठेवला पाहिजे, अशी साद देखील रसिकांना घातली.

दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने पर्पल जल्लोष – दिव्यांगांच्या महाउत्सवाचे अतिशय उत्कृष्टरित्या आयोजन केले आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. एखाद्या स्थानिक स्वराज संस्थेने आयोजित केलेला भारतातील हा सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवात मिरॅकल ऑन व्हील्स कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. हा कार्यक्रम म्हणजे अविश्वसनीय, अद्भूत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाचे सचिव राजेश अगरवाल म्हणाले.

आणखी वाचा-चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून, नऱ्हे भागातील घटना

‘मिरॅकल ऑन व्हील्स’ हा कार्यक्रम अविश्वसनीय असा असून हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारा कार्यक्रम ठरला. ज्या आत्मविश्वासाने सर्व कलाकारांनी आपल्या दिव्यांगत्वावर मात करत मनाचा ठाव घेणारे अद्भुत अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले ते खूपच कौतुकास्पद आहे. हा अविस्मरणीय कार्यक्रम पाहताना मीसुद्धा इतरांप्रमाणे भावूक झालो, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाचे सचिव राजेश अगरवाल, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, उपआयुक्त विठ्ठल जोशी, अण्णा बोदडे, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, तानाजी नरळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, सल्लागार विजय कान्हेकर, अभिजित मुरुगकर, दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, राजेंद्र वागचौरे, संगीता जोशी तसेच विविध राज्यातील दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.