मोटारसायकलवरून येऊन मंगळसूत्र हिसकाविण्याच्या घटना शहरात सातत्याने होत असताना आता रस्त्यावर महिलांच्या पर्स हिसकावून नेण्याच्याही घटना घडत आहेत. रविवारी मुंढवा भागात अशाच प्रकारात रस्त्यालगत थांबलेल्या महिलेने खांद्याला अडकविलेली पर्स हिसकावून नेण्याची घटना घडली. मुंढवा पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.
उर्वशी अनिल सोनी (वय ३५, रा. संजय पार्क, विमाननगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. सोनी या काही कामानिमित्त मुंढव्यातील एबीसी रस्ता या भागात गेल्या होत्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास तेथील सिटी बँकेसमोर त्या रस्त्यालगत थांबल्या होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून दोनजण त्यांच्याजवळ आले. काही कळण्यापूर्वी मोटारसायकलवर मागे बसलेल्या चोरटय़ाने सोनी यांच्या गळ्यात असलेली पर्स हिकावली. पर्समध्ये साडेपाच हजार रुपयांची रोख रक्कम होती.
 चिंचवड व पिंपळे गुरवमध्ये घरफोडी
चिंचवडच्या संभाजीनगर भागात दोन लाख १२ हजार रुपयांची, तर पिंपळे गुरव भागामध्ये सुमारे दोन लाख रुपयांच्या घरफोडीची घटना घडली.
चिंचवड येथील घटनेबाबत विदुला भालचंद्र बेलापूरकर (वय ५३, रा. प्रशांत सोसायटी, संभाजीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. बेलापूरकर यांच्या सदनिकेचे कुलूप अज्ञात चोरटय़ांनी तोडले. घरात बेडरूममध्ये ठेवलेली तिजोरीही चोरटय़ांनी फोडली. तिजोरीत असलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून चोरटय़ांनी दोन लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
पिंपळे गुरव येथील घटनेबाबत रॉकी मॅन्युअल मकासरे (वय ३०, रा. तिलक रेसिडेन्सी, देवकर पार्क, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी मकासरे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. चोरटय़ांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज कापून घरात प्रवेश केला. बेडरूममधील तिजोरी फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून दोन लाख दोन हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी पळवून नेला.