लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : महापालिकेच्या भोसरी-इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात चार कोटी रुपये खर्चून नव्याने तयार करण्यात आलेला कृत्रिम धावमार्ग (सिंथेटिक ट्रॅक) अवघ्या पाचच दिवसांत उखडला आहे. त्यामुळे धावमार्ग कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या उखडलेल्या धावमार्गामुळे सरावात अडचण येत असल्याने खेळाडूंमधून संताप व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील ॲथलेटिक्सचा सराव करणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी इंद्रायणीनगरमधील एकमेव मैदान आहे. या ठिकाणी चारशे मीटरचा आठ लेनचा कृत्रिम धावमार्ग आहे. अनेक वर्षांपासून धावमार्गावर खेळाडूंचा नियमित सराव आणि विविध स्पर्धांमुळे, तसेच बाहेरील वातावरणामुळे जुना धावमार्ग खराब झाला होता. वर्षभरापूर्वी जुना धावमार्ग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. अतिशय संथगतीने सुरू असलेले काम मार्चमध्ये पूर्ण झाले. खेळांडूसाठी धावमार्ग खुला करण्यात आला होता.

आणखी वाचा-पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

धावमार्गावर ॲथलेटिक्स खेळाडू सराव करत असताना अवघ्या पाचच दिवसांत हा मार्ग उखडण्यास सुरुवात झाल्याने खेळाडूंमध्ये निराशा पसरली आहे. साधे बूट घालून सराव करत असतानादेखील हा मार्ग उखडत आहे. धावण्याच्या शर्यतीतील स्पाइक बुटाला तळाकडच्या बाजूला खिळे असतात. अशा प्रकारचा बूट घालून या मार्गावर सराव केल्यास तो टिकणारच नसल्याचे खेळाडूंनी सांगितले. त्यामुळे या धावमार्गाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धावमार्ग उभारण्यावर पालिकेने चार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, मार्ग सुरू झाल्यानंतर अवघ्या पाचच दिवसांनी उखडल्याने खर्च वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

क्रीडा संकुल बंद

पाचच दिवसात धावमार्ग उखडल्याने बंद करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढाविली आहे. स्थापत्य विषयक कामकाजा करिता क्रीडा संकुल बंद ठेवण्यात आल्याचा फलक लावण्यात आला आहे.

आणखी वाचा-मावळमधून ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

कोट्यवधी रुपये खर्च करून बदलण्यात आलेला धावमार्ग पाच दिवसांतच ठिकठिकाणी उखडला आहे. अतिशय निकृष्ट दर्चाचे काम झाले आहे. सराव करताना स्पाइक बुटाचा वापर केल्यास आणखी खराब होईल, असे ॲथलेटिक्सचे प्रशिक्षक दिनेश देवकाते म्हणाले.

धावमार्गाची पाहणी केली जाईल. नादुरुस्त मार्ग ठेकेदाराकडून दुरुस्त करून घेण्यात येईल. ठेकेदाराला अद्याप पूर्ण मोबदला देण्यात आलेला नसल्याचे पालिकेच्या स्थापत्य, क्रीडा व उद्यान विभागाचे सहशहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.