पुणे : मध्य रेल्वेतील पुणे-दौंड मार्ग उपनगरीय विभाग (काॅरिडाॅर) म्हणून घोषित करावा, ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी रेल्वे बोर्डाने फेटाळून लावली आहे. पुणे विभागाकडून याबाबत पाठविलेल्या प्रस्तावाबाबतची मागणी फेटाळण्यात आल्याचे रेल्वे बोर्डाने पत्रकाद्वारे जाहीर केले.
पुणे दौंड मार्गावरून पाटस, केडगाव, यवत, उरळी, मांजरी, लोणी, हडपसरपर्यंत नियमित ३५ ते ४० हजार प्रवासी प्रवास करतात. या मार्गावरून चालणाऱ्या डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (डेमू) बंद पडत असल्याने प्रवाशांसह रोजचा ये-जा करणारे नोकरदार, कामगार, विद्यार्थी, शेतमाल घेऊन जाणारे शेतकरी यांची अधिक चांगली सोय व्हावी, यासाठी पुणे-दौंड हा उपनगरीय विभाग म्हणून घोषित करावा, या मार्गावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागण्यांसाठी येथील लोकप्रतिनिधींनी, व्यापारी संघटनांनी पाठपुरावा केला. मात्र, रेल्वे बोर्डाने ही मागणी फेटाळून लावली आहे.