पुणे: रेल्वेचे टाकाऊ डबे अनेक वेळा तसेच पडून असतात अथवा भंगारात जातात. अशाच एका टाकाऊ डब्याचा वापर करून त्याचे रुपांतर उपाहारगृहात करण्याची किमया रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली आहे. घोरपडी डिझेल शेड कार्यशाळेमध्ये हे उपाहारगृह सुरू झाले असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांची भोजन आणि नाश्त्याची सोय झाली आहे.

पुणे विभागात घोरपडी येथे डिझेल शेड कार्यशाळा १९८२ पासून कार्यरत आहे. सध्या तिथे आठशेहून अधिक कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र काम करतात. येथील कर्मचाऱ्यांचे हित समोर ठेवून आता त्यांच्यासाठी उपाहारगृह सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी जुन्या मोडकळीस आलेल्या डब्यात बदल करून हे उपाहारगृह साकारले आहे. यांत्रिकी विभागाने दिलेल्या वापरात नसलेल्या रेल्वे डब्यात आवश्यक बदल करून आकर्षक स्वरूपात हे उपाहारगृह तयार करण्यात आले आहे.

हेही वाचा… राष्ट्रवादी पक्षात येण्यास अनेक जण इच्छुक, मला खासगीत…जयंत पाटील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यशाळेत मोठ्या संख्येने कर्मचारी काम करीत असल्याने उपाहारगृह सुरू करावे, अशी मागणी होती. उपाहारगृह सुरू झाल्याने आता कर्मचाऱ्यांना चहा, नाश्ता, जेवण यासाठी बाहेर जावे लागणार नाही. या उपाहारगृहामुळे कर्मचाऱ्यांच्या खाण्याच्या सुविधेसोबत रेल्वेला महसूलही मिळणार आहे. या उपाहारगृहाची जबाबदारी किन इंडिया (बंगळुरू) या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, किन इंडियाचे सय्यद हसनैन अश्रफ यांच्यासह रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचारी यांनी उपाहारगृहाच्या उद्घाटनावेळी तेथील खाद्यपदार्थांची चव चाखली.

घोरपडी डिझेल शेडमध्ये रेल्वे इंजिनांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाते. हे कठीण काम असून, ते चोवीस तास सुरू असते. येथील कर्मचाऱ्यांना वेळी अवेळी जेवण आणि नाश्त्यासाठी बाहेर जावे लागत होते. आता त्यांना कामाच्या ठिकाणीच चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ उपलब्ध होतील. – डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे