पुणे : केंद्र सरकारने पुणे ते नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पातील पुणतांबा ते शिर्डी या १६.५० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्गिकेसाठी २३९.८० कोटी रुपये खर्चास बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे पुणे ते नाशिक रेल्वे मार्गिका प्रकल्प ‘हाय स्पीड’ ऐवजी ‘सेमी हायस्पीड’ होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
पुणे ते नाशिक ‘हाय स्पीड’ रेल्वे मार्गिका प्रकल्पांतर्गत खोडद गावातील ‘जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) हा जागतिक दुर्बीण संशोधन प्रकल्प अडथळा ठरत असल्याने रेल्वेमंत्री वैष्णव यांनी पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. समांतर मार्गात पुणतांबा ते शिर्डी हा १६.५० किलोमीटर लांबीच्या मार्गाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या मार्गिका प्रकल्पाच्या ‘डीपीआर’चे काम पूर्ण झाले असून, किरकोळ त्रुटी दूर करून रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी गुरुवारी या प्रकल्पातील पुणतांबा ते शिर्डी मार्गिकेला मंजुरी दिली. त्यामुळे समांतर मार्ग एक विशेष ‘कॉरिडॉर’ म्हणून उदयास येणार आहे. सध्या पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्गावरून अनेक गाड्या धावत असून, मार्गिकेची क्षमता १९.६६ टक्के आहे. समांतर मार्गामुळे हे प्रमाण ७९.७० टक्के जाण्याचा अंदाज वर्तवून या मार्गासाठी मागणी करण्यात आली होती.
या प्रकल्पामुळे साईनगर शिर्डीपर्यंतचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिरात येणाऱ्या भाविकांबरोबरच स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, व्यापारी, शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कृषी उत्पादनांची वाहतूक अधिक सोपी होईल आणि परिसराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.