पुणे : कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठवडय़ापासून पावसाने जोर धरला असतानाच आता विदर्भापाठोपाठ मराठवाडय़ातही बहुतांश भागात पाऊस होत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत हंगामात प्रथमच संपूर्ण राज्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी असल्याचे दिसून येते. काही भागांत पावसाने दाणादाण उडवून दिली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, बहुतांश धरणांमध्ये मोठा पाणीसाठा जमा होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात आणखी तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. १६ जुलैपासून पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
जून महिन्यामध्ये राज्यात तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यात पाण्याबाबत चिंता व्यक्त होत होती. जुलैच्या सुरुवातीला मात्र पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले. राज्याच्या किनारपट्टीच्या भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्रातून मोठय़ा प्रमाणात बाष्प भूभागाकडे येऊ लागले. परिणामी दक्षिण कोकणातून मोठय़ा प्रमाणावर पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस काही दिवसांतच संपूर्ण कोकण मुंबई, ठाण्यास पश्चिम महाराष्ट्रात पोहोचला, ४ जुलैपासून मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जवळच्या भागात पावसाने जोर धरला. गेल्या काही दिवसांत विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आणि मराठवाडय़ातही पावसाने हजेरी लावली. मंगळवारी राज्यात सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी होती.
गेल्या चोवीस तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत २०० ते ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यातील पेठ येथे सर्वाधिक ३२० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. महाबळेश्वर, लोणावळा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आदी जिल्ह्यांत १७० ते २५० मिलिमीटर पाऊस झाला. कोकण विभागातील जवाहर, मोखेडा, तालसरी, वाडा, सुधागड, पाली आदी भागांत १९० ते २८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाडय़ातील माहूर, किनवट आदी भागांत ७० मिलिमीटरहून अधिक पाऊस नोंदिवला गेला. विदर्भातील अहिरी येथे २०० मिलिमीटर, तर बल्लारपूर, अरणी, राजुरा, चंद्रपूर आदी भागांत ७० ते ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पाऊसमान..
- कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
- पालघर आणि रायगड जिल्ह्यात दोन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे.
- मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत तीन दिवस मुसळधारांचा अंदाज आहे.
- पुणे, नाशिक, सातारा आदी जिल्ह्यांतही दोन दिवस काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
- कोल्हापुरात तीन दिवस मुसळधारांचा अंदाज आहे.
- विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोलीत पावसाचा जोर अधिक राहणार आहे.