पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पदभरती प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व परीक्षांसाठी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय देण्यात आला आहे. या प्रक्रियेची कार्यपद्धती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

एमपीएससीच्या पदभरती परीक्षा राज्यभरातील लाखो उमेदवार देतात. त्यात आधी निवड झालेले काही उमेदवार पुन्हा परीक्षा देतात. या परीक्षेत संबंधित उमेदवाराने निवड होऊनही अपेक्षित पद न मिळाल्याच्या कारणास्तव ते पद न स्वीकारल्यास ते पद रिक्त राहते. त्यामुळे अन्य होतकरू उमेदवारांची संधी गमावली जाते. या पार्श्वभूमीवर, आयोगाने उमेदवारांकडून पदांच्या पसंतीक्रमाचे पर्याय मागवून  घेऊन भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय देण्याची पद्धत सुरू केली. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा २०१९च्या सुधारित निकालामध्ये ही पद्धत वापरली होती. त्यानंतर आता सर्वच परीक्षांसाठी ही पद्धत वापरण्यात येणार असल्याची माहिती एमपीएससीने दिली आहे.

आगामी काळात आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांकरिता गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने नमूद केले आहे.  आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक, टंकलेखक, कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे बनावट प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रकारांना चाप लागणार आहे.

उमेदवारांकडून स्वागत

ऑप्टिंग आऊटचा पर्याय देण्याचा निर्णय क्रांतिकारी आहे.  त्यामुळे अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्यास मदत होईल. तर टंकलेखन कौशल्य चाचणीमुळे गैरप्रकार थांबतील, असे उमेदवारांनी व्यक्त केली आहे.