पुणे : लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून मंडळस्तरावर आयोजित फेरफार अदालतीद्वारे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मिळून तब्बल दहा लाख नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी नऊ लाख ७३ हजार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात घेण्यात येत असलेल्या फेरफार अदालतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून नागरिकांच्या प्रलंबित, साध्या, वारस, तक्रारी, फेरफार नोंदी निकाली काढण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. २४ नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या फेरफार अदालतीमध्ये एकाच दिवसात ३३६१ नोंदी निर्गत करण्यात आल्या. नोंदी निकाली काढण्यात सुसूत्रता आणण्यासाठी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्येक मंडळस्तरावर संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात ९८ मंडळ मुख्यालयात झालेल्या फेरफार अदालतीत शेतकरी, खातेदार यांनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला.

दरम्यान, प्रलंबित २१ हजार ५६१ नोंदीपैकी ज्या ११ हजार २७८ नोंदी १५ दिवसांची मुदत पूर्ण होऊन मंजुरीस उपलब्ध झाल्या आहेत, त्यापैकी ३३६१ नोंदी निकाली काढण्यात आल्या. तसेच नागरिक आणि खातेदारांना निकाली काढलेल्या नोंदींचे सातबारा आणि फेरफार वाटप करण्यात आले. उर्वरित दहा हजार २८३ नोंदी तलाठी स्तरावर मुदत पूर्ण होण्यावर

प्रलंबित आहेत. तलाठी स्तरावरील प्रलंबित नोंदींच्या नोटीसा काढणे आणि बजावण्याबाबत गतीने प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांच्या फेरफार नोंदी तत्काळ निकाली काढण्यासाठी प्रशासन यापुढेही तत्परतेने कार्यरत राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले आहे.

तालुकानिहाय निकाली काढलेल्या फेरफार नोंदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२४ नोव्हेंबरला झालेल्या फेरफार अदालतीमध्ये हवेली तालुक्यात ३१५, पुणे शहर ११, पिंपरी चिंचवड ८४, शिरुर २७०, आंबेगाव १६३, जुन्नर २३१, बारामती ७७६, इंदापूर २०४, मावळ २४१, मुळशी १३४, भोर १११, वेल्हा ४०, दौंड १९४, पुरंदर १७० आणि खेड तालुक्यात ४१७ अशा एकूण ३३६१ फेरफार नोंदी निकाली काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रलंबित तक्रार प्रकरणांची संख्या ४१७३ इतकी असून हे कामकाज पूर्ण करुन निकाली काढण्याचे नियोजन आहे. त्याबाबतच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ई-हक्क प्रणालीवर लॉगइन करण्यासाठी https://pdeigr.maharashtra.gov.in/ संकेतस्थळाचा वापर करावा. नागरिकांनी ई-हक्क प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.