लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिवाजीनगर भागात किरकोळ वस्तूंची विक्री करुन उदरनिर्वाह करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित मुलींच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागातील चौकात प्लास्टिक पिशवी, पेन, तसेच फुले विक्री करण्याचे काम मुली करतात. दोघी सख्या बहिणी आहेत. पीडित मुली आणि त्यांचे कुटुंबीय फिरस्ते असून, ते किरकोळ वस्तुंची विक्री करुन उदरनिर्वाह करतात. पीडित मुलींच्या बहिणीचा विवाह आरोपी अल्पवयीन मुलांच्या नात्यातील एकाशी करण्यात आला आहे. त्यामुळे मुली आरोपींना ओळखतात.

१७ मार्च रोजी अल्पवयीन मुले शिवाजीनगर भागात आले. त्यांनी मुलींना गाठले. तुमच्या बहिणीची भेट घालून देतो, असे त्यांनी दोघींना सांगितले. त्यानंतर फूस लावून दोघींना दुचाकीवरुन घेऊन गेले. त्या वेळी आरोपी मुलांची आई तेथे होती. मुलींवर दोघांनी बलात्कार केला. मुलींनी आई-वडिलांकडे सोडण्याची विनंती केली. त्यानंतर आरोपींनी मुलींना पुन्हा शिवाजीनगर भागात सोडले. घाबरलेल्या मुलींनी या प्रकाराची माहिती आईला दिली.

पीडित मुलींच्या आईने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे, असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक हिरे तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. फूस लावून पळवून नेणे, तसेच विवाहाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी चारशेहून जास्त गुन्हे दाखल झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळकरी मुलीवर बलात्कार

शाळेत निघालेल्या मुलीला धमकावून तिच्यावर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना नगर रस्ता भागात घडली. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी एका २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शाळकरी मुलीचा आरोपी पाठलाग करायचा. शाळेत जात असताना आरोपीने तिला धमकाविले. तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन आरोपीने बलात्कार केला. घाबरलेल्या मुलीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तपास करत आहेत.