Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol : पुणे शहरातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रवींद्र धंगेकर हे दररोज मोहोळ यांच्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत, त्यामुळे पुण्यात चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, यानंतर आज रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करत जोरदार टीका केली आहे. तसेच एक्सवरील पोस्टमध्ये निवडणुकीतील एफिडेविट जोडत मुरलीधर मोहोळ यांच्यावर ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल असल्याचा दावा धंगेकरांनी केला आहे. तसेच पोस्टच्या शेवटी एक मोठा इशाराही धंगेकरांनी दिला आहे. “जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली २ प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात”, असं धंगेकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रवींद्र धंगेकरांनी काय म्हटलं?
“अतिशय सुसंस्कृत व सरळमार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटे बोलतात याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितलं की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. मी या ट्विटसोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन एफिडेविट मधील पानांची कॉपी जोडतोय त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते कशाकशा संदर्भात आहेत अगदी ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल आहे”, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
“मला माहित आहे, राजकीय कार्यकर्ता म्हटल की गुन्हे असतात. काही हेतूपरस्पर केलेले असतात काही आंदोलनातले असतात. परंतु केवळ बदनामी करण्यासाठी माझ्यावर १३ केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण त्या प्रेसची सुद्धा फसवणूक करत असतो आणि तमाम पुणेकरांची देखील फसवणूकच करत असतो, हे एका केंद्रीय राज्यमंत्री व खासदाराला अशोभनीय आहे. बाकी थेट जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली २ प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात”, असा इशारा रवींद्र धंगेकरांनी दिला आहे.
अतिशय सुसंस्कृत व सरळमार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटे बोलतात याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितले की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही.
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 24, 2025
मी या ट्विट सोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन एफिडेविट मधील पानांची कॉपी जोडतोय त्यांच्यावर… pic.twitter.com/DWeSVtk40h
महापौर असताना मोहोळांनी बिल्डरची गाडी वापरल्याचा धंगेकरांचा आरोप
“पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसांत पाहिले आहेत. परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असल्याचं ते सांगतात. मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो, मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरीचे महापौर होते. हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे. त्या गाडीचा नंबर होता Mh12 SW 0909, ही गाडी ना मोहोळ यांची होती, ना पुणे महानगरपालिकेचं शासकीय वाहन. ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची”, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
“हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर. पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का? साडेनऊ हजार कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता नाही आली का? या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले? विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत”, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
