पुणे : कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. आज, सोमवारपासून १५ सप्टेंबपर्यंत मुंबई-ठाणे परिसरासह संपूर्ण कोकण विभाग, पुणे-नाशिकसह पश्चिम-उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भ तसेच मराठवाडय़ात काही भागांत मुसळधारांचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल, अशी माहिती हवामान विभागाने रविवारी दिली.

मोसमी पावसाची तीव्रता सध्या मूळ आगमनभाग म्हणजे दक्षिणेकडे आहे. त्याचप्रमाणे सध्या ओदिशापासून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. याशिवाय पूर्व-मध्य अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीजवळ वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून राज्यात मोठय़ा प्रमाणावर बाष्प येऊन पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. महाराष्ट्रासह ओदिशा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, कर्नाटक किनारपट्टीच्या भागांतही पाऊस होत आहे.

पुण्यात रविवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळला. महाबळेश्वर, सातारा, सांगली, जळगाव, रत्नागिरी, औरंगाबाद, परभणी, अमरावती, अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा आदी जिल्ह्यांच्या विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात पुढील चार-पाच दिवस तुरळक भागांत जोरदार पाऊस कोसळेल. किनारपट्टीच्या भागाला सोसाटय़ाच्या वाऱ्याचा माराही सहन करावा लागेल. मध्य महाराष्ट्रातही अनेक भागांत पाऊस जोर धरणार आहे. घाट विभागांत मुसळधारांची शक्यता आहे. मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात अनेक भागांत मेघगर्जना आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंदाज, इशारा..

  • मुंबई, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांत १२ ते १५ सप्टेंबर या कालावधीत काही भागांत मुसळधारांची शक्यता.
  • रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागांत जोरदार पावसाचा इशारा.
  • पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतही १२ ते १५ सप्टेंबरला मोठय़ा पावसाचा अंदाज, घाट विभागात जोर अधिक.
  • नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधारांची शक्यता
  • अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज.