विधानसभा निवडणुकींना लक्षात घेऊन राज्यात मुख्यमंत्री बदलाबाबतची चर्चा जोर धरत असतानाच आता खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘पक्ष नेतृत्वाकडून देण्यात येणारी कोणतीही जबाबदारी स्वीकारेन’ असे म्हणून  खांदेपालटाच्या वृत्ताला अप्रत्यक्षरित्या दुजोरा दिला आहे. ते पुण्यात बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “पक्षनेतृत्वाचा निर्णय अंतिम असून तो आपल्याला पूर्णपणे मान्य असेल. पक्षनेतृत्व देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार आहोत. हायकमांडचा निर्णय योग्यवेळी समोर येईलच, तोपर्यंत राज्याचा प्रमुख या नात्याने संपूर्ण निष्ठेने काम करत राहीन.” असेही ते म्हणाले.
येत्या दिवाळीआधी विधानसभा निवडणुका असल्याने राज्यात मुख्यमंत्री बदलाची खेळी काँग्रेसकडून केली जाण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी पृथ्वीराज चव्हाण यांची उचलबांगडी केली जाण्याची शक्यता आहे. त्यात आता मुख्यमंत्रीपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांचेही नाव आघाडीवर असल्याचे समजते. काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधींचे विश्वासू म्हणून सुशीलकुमार ओळखले जातात त्यामुळे शिंदे यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अद्याप तरी काँग्रेसकडून अधिकृतरित्या कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.