पुणे : राज्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठीच्या नवसाक्षरता अभियानाचे काम करण्यावर शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातल्याने शिक्षण विभागाने कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, या इशाऱ्यानंतरही या अभियानाच्या कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे आतापर्यंत राज्यभरातील केवळ ३४ हजार निरक्षरांचीच ऑनलाइन नोंदणी झाली आहे. या वेगाने १२ लाख निरक्षरांना शोधून त्यांना साक्षर करण्याचे काम कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नवसाक्षरता अभियानातील निरक्षरांच्या सर्वेक्षणाचे काम अशैक्षणिक असल्याचे सांगत शिक्षक संघटनांनी या कामास तीव्र विरोध केला. त्यामुळे शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार ८ सप्टेंबरपासून अभियानाचे काम राज्यभरात सुरू होऊ शकले नाही. या योजनेच्या अनुषंगाने राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत निरक्षरांना साक्षर करणे हे शैक्षणिकच काम असल्याचे अधोरेखित करण्यात आले. त्यानंतर शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे यांनी संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध करून अभियानाचे काम न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा दिला होता. तसेच निरक्षरांचे सर्वेक्षण, स्वयंसेवकाच्या नोंदणीसाठी मुदतवाढही देण्यात आली होती.

हेही वाचा >>>राज्यातही ओबीसी जनगणना करा; भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ३३ हजार ३९५ निरक्षरांची नोंदणी करण्यात आली आहे. तर दोन हजार ६९० स्वयंसेवकांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंतच्या नोंदणीत काही जिल्ह्यांत दहा हजारांपर्यंत निरक्षरांची नोंद झाली आहे, तर काही जिल्ह्यांत दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. राज्याला १२ लाख ४० हजार निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र अभियानाच्या कामाला गती मिळत नसल्याने उद्दिष्ट साध्य कसे करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अभियानातील निरक्षरांना साक्षर करून त्यांची फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेतर्फे  परीक्षा घेतली जाणार आहे. 

सर्वाधिक नोंदणी ..

नाशिक -९ हजार १६८

अमरावती – ५ हजार ४७४

वाशिम  ४ हजार ११७

अकोला – ३ हजार ५८७