लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : सदनिका खरेदी केल्यानंतर खरेदीदाराचे नाव करदाता म्हणून स्वयंचलित पद्धतीने लागणार आहे. त्याकरिता महापालिकेत जाऊन स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. ही सुविधा राज्यात मुंबई महापालिकेत उपलब्ध करून त्यानंतर आता पनवेल महापालिकेतही याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
व्यवसायपूरकता (इज ऑफ डुइंग बिझनेस) उपक्रमांतर्गत जागतिक बँकेकडून दिल्ली आणि मुंबई ही दोन शहरे निवडण्यात आली होती. त्याअंतर्गत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महापालिका क्षेत्रात ही सुविधा सन २०१९ पासून सुरू आहे. त्यानंतर राज्यातील कोणत्याही महापालिकेने पुढाकार घेऊन ही सुविधा सुरू केलेली नाही. मात्र, पनवेल महापालिकेने पुढाकार घेऊन ही सुविधा सुरू केली आहे. दिवाळीनंतर ही सुविधा सुरू केली जाणार आहे. प्रचलित पद्धतीनुसार सदनिका खरेदी केल्यानंतर खरेदीदाराला संबंधित महापालिका किंवा नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे करदाता म्हणून आपले नाव लागण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागतो. मात्र, जागतिक बँकेच्या सुचनेनुसार व्यवसायपूरकतेमध्ये या सर्व सुविधांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
आणखी वाचा-पुणे : मिळकतकरातील ४० टक्के सवलत योजनेला मुदतवाढ; ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा
याबाबत बोलताना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उपमहानिरीक्षक (संगणक) अभिषेक देशमुख म्हणाले, ‘पनवेल महापालिकेने पुढाकार घेऊन ही सुविधा सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानुसार ही सुविधा सुरू होणार आहे. दस्त झाल्यानंतर महापालिकेकडील आणि दस्तातील माहिती १०० टक्के जुळल्यानंतर तातडीने नव्या खरेदीदाराचे नाव करदाता म्हणून लागेल. अन्यथा महापालिकेकडून खरेदीदाराला संपर्क केला जाईल. नोंदणी विभागाकडून खरेदी-विक्रीदाराचे नाव, मालमत्तेचा तपशील आदी अनुषंगिक माहिती स्वयंचलित पद्धतीने पाठविली जाईल.’
मालमत्ता खरेदीबाबत नोंदणी झाल्यानंतर त्यांचे ‘ऑटो म्युटेशन’ होणे आवश्यक आहे. एखाद्या मालमत्तेची खरेदी-विक्री झाल्यानंतर मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आणि करदाता अभिलेख (टॅक्स पे रेकॉर्ड) यांवर त्याची नोंद होते. या दोन्ही ठिकाणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून आता स्वयंचलित माहिती पाठविण्याची सुविधा आहे. म्हणजे मिळकत पत्रिका अद्ययावत करण्यासाठी सर्व्हर ते सर्व्हर माहिती पुढे पाठवता येऊ शकते. विभागाचा सर्व्हर आणि संबंधित महापालिकेचा सर्व्हर यांचे एकत्रीकरण करण्याची सुविधा आहे. त्यामुळे सदनिका खरेदी करणाऱ्यांना महापालिकेत जाऊन स्वत:चे नाव मिळकतीवर लावण्यासाठी स्वतंत्र अर्ज करायची गरज नाही. -अभिषेक देशमुख, नोंदणी उपमहानिरीक्षक (संगणक)