पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्रसह विविध अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या परीक्षांचे अर्ज विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरता येतील.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. तसेच सीईटीची प्रक्रियाही लांबणीवर पडली आहे. सीईटी कधी होणार या बाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. मात्र सीईटीचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यामुळे सीईटी सेलकडून आता विविध अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषि शिक्षण अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी नियमित शुल्कासह ७ जुलैपर्यंत नोंदणी करता येईल. तर विलंब शुल्काह १५ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. चार वर्षांच्या एकात्मिक शिक्षणशास्त्र (बी.ए. बी.एड./ बी.एस्सी. बी.एड.) अभ्याक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) ऑनलाइन नोंदणी सुरू  करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी ८ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. एमबीएस-एमएमएस अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी १७ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तर पाच वर्षांच्या एकात्मिक विधी पदवी अभ्यासक्रमासाठी १२ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार असल्याची माहिती सीईटी सेलने संकेतस्थळावर दिली आहे. अधिक माहिती अधिक माहिती www.mahacet.gov   संके तस्थळावर उपलब्ध आहे.