लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाविद्यालय, उच्च शिक्षण संस्थेत ७५ टक्के उपस्थिती अनिवार्यतेचा नियम आहे. मात्र, आता या नियमात शिथिलता देण्याचे संकेत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) सचिव प्रा. मनीष जोशी यांनी दिले. एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे संकेत दिले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘अभियांत्रिकीचे भविष्य : अभियंता विद्यार्थ्यांसाठीचे करिअर मार्ग आणि संधी’ या विषयावर आयोजित व्याख्यानावेळी डॉ. जोशी बोलत होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह डॉ. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह निवेदिता एकबोटे, मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कल्याण जोशी, मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगरचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव या वेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत जोशी यांनी विद्यार्थ्यांचे अभ्यासेतर वाचन, ताणतणाव व्यवस्थापन या विषयी जाणून घेतले.

प्रा. जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणात काही बदल अपेक्षित असल्यास सुचवण्याचे आवाहन केले. त्या वेळी एका विद्यार्थ्याने शिक्षणेतर उपक्रमांत सहभागी होताना ७५ टक्के उपस्थितीच्या नियमामुळे अडचण होत असल्याचे नमूद केल्यावर सभागृहात हशा पिकला. मात्र, या प्रश्नाचे सकारात्मक पद्धतीने उत्तर देत प्रा. जोशी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या ७५ टक्के उपस्थितीबाबत नियम केलेला काळ आणि आताचा काळ यात फरक आहे. काही महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थितीबाबत नरमाईची भूमिका घेतात. तर, काही महाविद्यालये आठमुठेपणा करतात. मात्र, आता शिक्षणाची अनेक माध्यमे आहेत. शिक्षण पद्धतीत बदल झाले आहेत. त्यामुळे ७५ टक्के उपस्थितीच्या नियमात शिथिलता आणण्याचा विचार करता येऊ शकतो.’

प्रा. जोशी म्हणाले, भारतात काही वर्षांपूर्वी मोजके नवउद्यमी होते. मात्र, आता १ लाख २५ हजारांहून अधिक नवउद्यमी देशभरात आहेत. देशभरात नवउद्यमींची परिसंस्था निर्माण झाली आहे. तरुणांमध्ये विजिगिषू वृत्ती निर्माण झाली आहे. तरुण आता रोजगार देणारे होत आहेत. ज्ञानाचा नेमका वापर हे सर्वांत आव्हानात्मक आहे. समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी ज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. समाजाच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, परस्पर सहकार्य गरजेचे आहे.

‘अभ्यासक्रम अद्ययावत असल्यास विद्यार्थी आकर्षित होतील. त्यामुळे अभ्यासक्रम अद्ययावत केले पाहिजेत. १५५५ अभ्यासक्रम ‘स्वयम’वर आहेत. उद्योगांना अपेक्षित कौशल्य प्राप्त करण्यासाठी ॲप्रेंटिस समाविष्ट पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे,’ अशी माहिती प्रा. जोशी यांनी दिली.

‘अध्यापनात अभिनवतेची गरज’

‘प्राध्यापकांनी चौकटीबाहेरचा विचार करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षणातील रस टिकून राहण्यासाठी अभिनव पद्धती अध्यापनात आणण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेने स्वतःच्या ‘यूएसपी’चा विचार केला पाहिजे,’ असेही प्रा. जोशी यांनी प्राध्यापकांशी संवाद साधताना नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आयुष्यात अशक्य काहीही नाही. सकारात्मक राहून प्रयत्न केले पाहिजेत. अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आता अनेक संधी निर्माण होत आहेत,’ असे डॉ. एकबोटे यांनी सांगितले.