पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील युनिटची हद्द आणि रचना नव्याने तयार करण्यात आली आहे. पूर्वी अस्तित्वात असलेल्या युनिट क्रमांक एक ते पाच या रचनेत बदल करून आता चार युनिटमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रशासकीयदृष्ट्या कार्यक्षमता वाढवणे आणि गुन्हे तपासाच्या कामकाजात गती आणणे हा या पुनर्रचनेचा उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत यापूर्वी गुन्हे शाखेची पाच युनिट कार्यरत होती. नव्या फेररचनेत पाच युनिटऐवजी चार युनिट कार्यरत राहणार आहेत. या नव्या फेररचनेमुळे प्रत्येक युनिटला पोलीस ठाण्याची निश्चित जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे चाकण, भोसरी, म्हाळुंगे या मोठ्या औद्योगिक पट्ट्यातील गुन्हे तपासात सुसूत्रता येईल. नागरी भागातील पिंपरी, चिंचवड, सांगवी, वाकड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रकरणांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. तसेच, ग्रामीण आणि औद्योगिक भागातील समन्वय अधिक मजबूत होईल. पूर्वी काही युनिट्सवर पोलीस ठाण्यांची संख्या अधिक होती. नव्या रचनेनंतर प्रत्येक युनिटला संतुलित जबाबदारी मिळेल. त्यामुळे तपास अधिक गतिमान होईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.

पोलीस ठाणेनिहाय नवीन रचना

युनिट एकमध्ये पिंपरी, निगडी, चिंचवड, संत तुकारामनगर, दापोडी, सांगवी, युनिट दोन हद्दीत वाकड, हिंजवडी, काळेवाडी, बावधन, रावेत, युनिट तीनमध्ये भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी, चाकण, चाकण दक्षिण (प्रस्तावित), आळंदी आणि युनिट चारमध्ये देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव, चिखली, उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी (प्रस्तावित), म्हाळुंगे एमआयडीसी या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.

पिंपरी आयुक्तालयाची हद्द सर्वाधिक

पिंपरी आयुक्तालयाचे एकूण क्षेत्रफळ ११५ चौरस किमी इतके असून अंदाजे ४० लाख इतकी लोकसंख्या येते. पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीणपेक्षा भौगोलिकदृष्ट्या पिंपरी-चिंचवडची हद्द सर्वाधिक आहे. पिंपरी-चिंचवड शहर, पुण्यातील बावधन, बालेवाडी, ग्रामीणमधील चाकण, खेड, आळंदी, तळेगाव दाभाडे हा परिसर आयुक्तालयांतर्गत येत आहे.

आयुक्तालयांतर्गत २२ पोलीस ठाणे

पुणे शहर व पुणे ग्रामीण दलाची विभागणी करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. सुरुवातीला आयुक्तालयाच्या हद्दीत १४ पोलीस ठाणी होती. त्यानंतर चिखली, रावेत, शिरगाव आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे मंजूर झाले. त्यामुळे १८ पोलीस ठाणे होती. त्यानंतर वाकड, हिंजवडी, पिंपरी आणि भोसरी या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने अनुक्रमे काळेवाडी, बावधन, संत तुकारामनगर आणि दापोडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. आयुक्तालयांतर्गत आता २२ पोलीस ठाणे आहेत.