पिंपरी : पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘निर्जली’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकाविला. तर, तमीळ भाषेतील ‘थुनाई’ या लघुपटाने साऱ्यांचे मन जिंकून सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार आपल्या नावे केला. सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन फिल्ममध्ये ‘लेस’ने बाजी मारली.या महोत्सवात भारतासह ४० देशांमधून आलेले ९० पेक्षा अधिक चित्रपट, लघुपट, माहितीपट, ॲनिमेशन आणि ६० सेकंद फिल्म प्रदर्शित करण्यात आल्या. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रियंका भेरिया आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तुषार शिंगाडे यांना प्रदान करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २९ ते ३१ मे दरम्यान पार पडला. प्रत्येक चित्रपटामागची कल्पकता, सामाजिक जाणीव, दिग्दर्शन आणि तांत्रिक कसोट्या अनुभवायला प्रेक्षकांनी गर्दी केली होती. तीन दिवसांत चार हजार रसिकांनी चित्रपट पाहिला. राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, महापालिकेचे उपायुक्त पंकज पाटील यांच्या हस्ते परीक्षकांमार्फत निवडण्यात आलेल्या विजेत्यांना पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये चित्रित गीत, ॲनिमेशन फिल्म, चित्रपट, लघुपट व माहितीपट व ६० सेकंद चित्रपट अशा वर्गवारीचा समावेश होता. विशेष अधिकारी किरण गायकवाड, दिग्दर्शक सुजय डहाके, रमेश होलबोले, अभिनेत्री राजश्री देशपांडे या वेळी उपस्थित होते.
दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कलाविश्वाची व्याप्ती विस्तारणारा उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक विश्वाचे भावबंध यातून जोडले जातात. नवोदित कलाकार, दिग्दर्शक आणि रसिक प्रेक्षकांमधील बंध दृढ करणारा हा महोत्सव पुढच्या वर्षी आणखी मोठा, व्यापक आणि प्रभावशाली असेल, याची खात्री आहे. या शहरात अनेक नामवंत कलाकार आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा महोत्सव आयोजनासाठी निश्चित होईल. अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रित करून हा महोत्सव अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करू, यासाठी सर्व सहकार्य करण्यासदेखील तयार आहोत.’
अभिनेत्री राजश्री देशपांडे म्हणाल्या, ‘कला क्षेत्रात अभिव्यक्ती सादर करण्याची संधी मिळत असते. महोत्सवाच्या माध्यमातून त्याचे वैश्विक पातळीवर आदान-प्रदान होण्यास मदत मिळत असते. यशासाठी संघर्ष महत्त्वाचा असून, त्यात सातत्य असावे.’
शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला. पहिल्याच वर्षी रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. महापालिका असे उपक्रम राबविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील.- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड