पुणे : राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या निकालांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार एमएचटी-सीईटीचा निकाल १६ जून रोजी जाहीर होणार आहे. तर बीबीए-बीसीए, पाच वर्षे मुदतीच्या विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीचा निकाल आज (बुधवारी) जाहीर होणार आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत सर्व पदवी, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार सीईटी सेलकडून परीक्षांचे आयोजन करण्यात आले. राज्य मंडळाने बारावीचे निकाल जाहीर करून आता महिन्याभराचा कालावधी होत आला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माण, विधी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या समाइक प्रवेश परीक्षांच्या (सीइटी) निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १२ सीईटींचा निकाल सीईटी सेलने जाहीर केला आहे. तसेच जेईईसारख्या परीक्षांचे निकालही जाहीर झाल्याने विद्यार्थी, पालकांना विशेषतः एमएचटी-सीईटीच्या निकालाची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सीईटी सेलकडून उर्वरित सीईटीच्या संभाव्य तारखा प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. त्यानुसार निकाल जाहीर केले जातील. विविध अभ्यासक्रमांच्या निकालाच्या तारखा सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती राज्य सीईटी सेलने दिली आहे.
सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी बीबीए, बीसीए सीईटी, तसेच पाच वर्षे मुदतीच्या विधी अभ्यासक्रम सीईटीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी पदवी प्रवेशासाठीच्या एमएचटी-सीईटीचा निकाल १६ जून, तर तीन वर्षे मुदतीच्या विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीचा निकाल १७ जूनला जाहीर केला जाणार आहे.