पिंपरी : सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त व्यक्तीला व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अटक आणि आर्थिक फसवणूक (मनी लॉन्ड्रिंगच्या) गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून लाखोंची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना २३ जुलै ते २९ सप्टेंबर दरम्यान समाजमाध्यमातील व्हॉट्सॲपवरून ऑनलाइन पद्धतीने घडली.
या प्रकरणी ७१ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बँक खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या समाजमाध्यमातील व्हॉट्सॲप नंबरवर आरोपींनी व्हिडिओ कॉल केला. त्यावरून फिर्यादीला सांगितले की, त्यांच्या नावावरील मोबाईल नंबर चाईल्ड पोर्नाग्राफीमध्ये वापरला गेला आहे. सायबर क्राईम विभागाने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून एका बँकेचे एटीएम कार्ड एका व्यक्तीच्या घरातून जप्त केले आहे. फिर्यादीने मनी लॉन्ड्रिंगसाठी खाते वापरण्यास देऊन २५ लाख रुपये कमिशन घेतले आहे, असे आरोपींनी सांगितले.
फिर्यादीला सीबीआय विभाग आणि कोर्टासमोर ऑनलाईन व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवरून हजर करून त्यांना २३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत डिजिटल अटक करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत, असे सांगितले. गुन्ह्याच्या तपासासाठी फिर्यादीच्या खात्यातील पैसे न्यायालयाने दिलेल्या खात्यात अनुक्रमे १५ लाख ५० हजार रुपये आणि ७ लाख रुपये वळती करण्यास सांगितल्यावर फिर्यादीने ते पाठवले. यानंतर आरोपींनी पुन्हा व्हिडिओ कॉल करणे बंद केले, तेव्हा फिर्यादीला फसवणूक झाल्याचा संशय आला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने वार
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका १७ वर्षीय मुलावर कोयत्याने आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना श्रीनगर काळेवाडी येथे घडली.
या प्रकरणी अल्पवयीन मुलाने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल भीमराव कांबळे (२२, श्रीनगर काळेवाडी) याला अटक केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र घरी जात असताना आरोपी अचानक आडवे आले. विशाल याने नवरात्रीच्या वेळी झालेल्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली. यानंतर विशाल याने कमरेला लावलेला लोखंडी कोयता काढून मारहाण केली. इतर आरोपींनी सिमेंटचे गट्टू उचलून फिर्यादीच्या डोक्यात, तोंडावर जोरजोरात मारले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. आरोपींनी फिर्यादीच्या मित्रालाही मारहाण केली. लोक मदतीला येत असल्याचे पाहून विशाल याने हातातील कोयता हवेत उंचावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एका व्यक्तीची ५० लाख दोन हजार ५२९ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत ३९ वर्षीय व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला समाजमाध्यमातील एका व्हाट्सअप समूहात सहभागी करून घेतले. त्यांचा विश्वास संपादन करून एका लिंकद्वारे एका ॲप्लिकेशनवर गुंतवणुकीच्या नावाखाली, वेगवेगळ्या बँक खात्यांवर विविध शेअर्स आणि आयपीओच्या नावाखाली रक्कम भरण्यास भाग पाडले. ही रक्कम काढण्यासाठी पुन्हा वेगवेगळे कराच्या नावाखाली रक्कम भरण्यास सांगितले. अशा प्रकारे फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ५० लाख दोन हजार ५२९ रुपये भरण्यास भाग पाडून त्या रकमेचा अपहार करून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.
पाण्याचा टँकरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना म्हाळुंगे ते तळवडे रोडवर घडली.
वासिम इक्बाल मिन्ने (४२, तळेगाव, मावळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३६ वर्षीय व्यक्तीने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पाण्याचा टँकर नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवला. त्याने तळवडे बाजूकडे जाणारे वासिम यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात वासिम यांच्या हाता-पायाला दुखापत झाली आणि टँकरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने गंभीर जखमा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
