पुणे : अमली पदार्थांची तस्करी प्रकरणात महसूल गु्प्तचर यंत्रणेच्या पुणे विभागाने (डिरेक्टोरेल ऑफ रेव्हून्य इंटेलिजन्स) आणि सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने एका परदेशी महिलेला अटक केली. तिच्याकडून तीन किलो ८१५ ग्रॅम क्रिस्टल मेथ हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या या अमली पदार्थाची आंतराष्ट्रीय बाजारात किंमत सात कोटी ६३ लाख रुपये आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावर ही कारवाई करण्यात आली.
परदेशी महिला मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी करणार असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या पुणे विभागाला मिळाली होती. त्यानंतर ‘डीआरआय’च्या पथकाने याबाबतची माहिती कस्टमच्या पथकाला दिली. तस्करी करणारी महिला एका प्रवासी बसमधून मुंबई-बंगळुरू महामार्गावरुन निघाली होती. त्यानंतर पथकाने सापळा लावला. पथकाने प्रवासी बस अडवून तपासणी सुरू केली. परदेशी महिलेची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्याकडे अमली पदार्थ सापडले नाहीत.
बसची पुन्हा तपासणी करण्यात आली. बसमधील दुसऱ्या कप्प्यात प्रवाशांचे सामान ठेवण्यात येते. या कप्प्याची पथकाने तपासणी केली. परदेशी महिलेने आणखी एक बॅग कप्प्प्यात ठेवल्याचे आढळून आले. बॅगची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्या बॅगेत सहा सलवार ठेवण्यात आले होते. सलवारमध्ये पुठ्ठा लावून खास कप्पा करण्यात आला होता. या कप्प्यात तिने प्लास्टिकच्या पिशवीत क्रिस्टल मेथ लपवून ठेवले होते. पथकाने महिलेकडून सात कोटी ६३ लाखांचे क्रिस्टल मेथ जप्त केले. जप्त केलेल्या तीन किलो ८१५ ग्रॅम क्रिस्टल मेथची आंतराष्ट्रीय बाजारात किंमत सात कोटी ६३ लाख रुपये आहे. याप्रकरणी महिलेला अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एनडीपीएस ॲक्ट १९८५) अटक करण्यात आली आहे. महिलेने अमली पदार्थ कोणाकडून आणले, तसेच ती कोठे विक्री करणार होती, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
क्रिस्टल मेथ म्हणजे काय ?
क्रिस्टल मेथचे शास्त्रीय नाव मेथॅम्फेटामाइन आहे. हे एक कृत्रिम रासायनिक औषध असून, उत्तेजक म्हणून मेंदू आणि मज्जासंस्थेवर तीव्र परिणाम करते. एलएसडी, क्रिस्टल मेथ, मेफेड्रोन हे अमली पदार्थ रासायनिक पदार्थांचा वापर करून तयार केले जातात. या अमली पदार्थांचे सेवन केल्यास शरीरावर दुष्परिणाम होतात. अशा प्रकारचे अमली पदार्थ सेवन केल्यास उत्तेजन येते. छुप्या पद्धतीने अशा प्रकारचे अमली पदार्थ तयार केले जातात.