सांगवी येथील लष्करी मैदानात तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या जवानांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी वीस हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. यातील ३५ हजार रुपये पीडित तरुणीस देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी दिला.
सुमिंदरसिंग महिपालसिंग (वय ३०, रा. राजस्थान) आणि रजनेशकुमार सुरेशचंद्रकुमार (वय ३३, रा. उत्तर प्रदेश) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही राजपुताना रेजिमेन्टचे जवान असून नियुक्तीवर औंध येथे आले होते. ७ एप्रिल २०१० रोजी एक १९ वर्षांची तरुणी तिच्या मित्रासह सांगवी येथील ‘स्वराज गार्डन’च्या पाठीमागील लष्करी मैदानातून जात होते. त्या वेळी या दोन जवानांनी त्यांना अडविले. पीडित तरुणीच्या मित्राला जबर मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. त्यानंतर दोघा जवानांनी तरुणीवर तेथील खड्डय़ात सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिल्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात सहायक सरकारी वकील लक्ष्मण मैंदाड यांनी नऊ साक्षीदार तपासले. त्यामध्ये वायसीएम रुग्णालयाच्या डॉ. मीरा खरात यांची साक्ष महत्त्वाची ठरली. समिंदरसिंग याची डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह आली. तर रजनेशसिंग याची आली नाही. मात्र, परिस्थितीजन्य पुराव्यात तो दोषी आढळून आला. या खटल्याचा तपास पोलीस निरीक्षक बी. एस. सोनवणे आणि सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर जाधव यांनी केला. अ‍ॅड मैंदाड यांनी युक्तिवाद केला, की पीडित मुलची आरोपींबरोबर काहीच दुश्मनी नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध खोटा गुन्हा का दाखल करेल. आरोपींनी हा गुन्हा नियोजनपूर्वक केला असल्याचे पुराव्यावरून दिसून येते. न्यायालयाने दोघांनाही सामूहिक बलात्काराच्या आरोपावरून दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यामधील ३५ हजार रुपये पीडित मुलीस देण्याचा आदेश दिला.