scorecardresearch

पुणे : एरंडवणे येथील नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला, कर्वेनगर, कोथरूड आणि इतर परिसराकडे जाणे झाले सुलभ

रस्ता खुला झाल्याने कर्वेनगर, कोथरूड, सिंहगड रोड आणि वारजे परिसराकडे जाणे सुलभ होणार असून, रजपूत झोपडपट्टी परिसरात होणारी वाहतूक कोंडीही दूर होणार आहे.

पुणे : एरंडवणे येथील नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला, कर्वेनगर, कोथरूड आणि इतर परिसराकडे जाणे झाले सुलभ
एरंडवणे येथील रस्ता वाहतुकीसाठी खुला (संग्रहित छायाचित्र)

पुणे : एरंडवणे येथील म्हात्रे पुलाजवळील रजपूत झोपडपट्टीतून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून हा रस्ता सांडपाणी वाहिन्यांच्या कामांमुळे आणि रस्ता रुंदीकरणासाठी बंद होता. रस्ता खुला झाल्याने कर्वेनगर, कोथरूड, सिंहगड रोड आणि वारजे परिसराकडे जाणे सुलभ होणार असून, रजपूत झोपडपट्टी परिसरात होणारी वाहतूक कोंडीही दूर होणार आहे.

नदीपात्रातील शिवणे-खराडी रस्त्यापैकी डेक्कन चौपाटी ते म्हात्रे पुलाजवळील रजपूत झोपडपट्टी हा दोन किलोमीटर लांबीचा नदीकाठचा रस्ता महापालिकेने विकसित केला आहे. नदीपात्रापासून डेक्कनहून म्हात्रे पुलाकडे जाणारा रस्ता रजपूत झोपडपट्टी परिसरातून जातो. या परिसरातील शंभर मीटर अंतरात काही झोपड्या आणि काही बैठी घरे होती. त्यामुळे, या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाची मागणी सातत्याने होत होती. गेल्या दहा वर्षांपासूनही भूसंपादनाची आणि पुनर्वसनाची प्रक्रिया रखडली होती. मात्र आता महापालिकेने ३६ मिळकतींचे पुनर्वसन केले असून मिळकती पाडून रस्ता रुंदीकरण पूर्ण केले होते. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर महापालिकेकडून सांडपाणी वाहिन्या टाकण्याची कामे हाती घेण्यात आली होती.

हेही वाचा – पुणे : एमटीडीसीच्या निवासस्थानांत तृणधान्यांची न्याहारी, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त उपक्रम

ही कामे रखडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. मात्र, सांडपाणी वाहिन्या टाकण्याची कामे तसेच दुरुस्तीची रखडलेली कामे पूर्ण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली. सांडपाणी वाहिन्या आणि पाणीपुरवठा विभागाची कामे पूर्ण झाल्याने पथ विभागाकडून डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 11:29 IST

संबंधित बातम्या