पुणे : खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या असे गंभीर गुन्हे दाखल असलेला दरोडेखोर लखन भोसले सातारा पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील शिक्रापूर परिसरात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. भाेसले याने पोलिसांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यानंतर सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात भोसले गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. भाेसले याने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन ऊर्फ महेश पोपट भोसले (रा. वडगाव जयराम वस्ती, ता. खटाव, जि. सातारा) याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. सातारा शहरात दोन दिवसांपूर्वी त्याने कोयत्याच्या धाकाने लूटमार केली होती. त्याने सोनसाखळी हिसकावण्याचे दोन गुन्हे केले होते. याप्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. लखन पसार झाला होता. सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. तो नगर रस्त्यावरील शिक्रापूर भागात त्याच्या नातेवाइकांकडे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
सातारा पोलिसांच्या पथकाने शनिवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मलठण फाटा परिसरात सापळा लावला. पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच त्याने तीक्ष्ण शस्त्राने पोलिसांवर हल्ला चढविला. हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या वेळी प्रसंगावधान राखून तपास पथकातील अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ पिस्तुलातून गोळीबार केला. गोळीबारात भोसले गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लखन भोसलेची दहशत
लखन ऊर्फ महेश पोपट भोसले याच्याविरुद्ध खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे २२ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. सातारा जिल्ह्यातील दहीवडी, म्हसवड, वडूज, तसेच पुणे जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर, बारामती तालुका, इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून त्याला २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. ‘मकोका’ कारवाईत कारागृहात असलेल्या भोसलेने न्यायालयाकडून जामीन मिळविला होता.