पुणे : सिंहगड रस्त्यावरील सराफी पेढीत पिस्तुलाच्या धाकाने दरोडा घालून पसार झालेल्या चोरट्यांना अहिल्यानगर परिसरातून अटक करण्यात आली. चोरट्यांबरोबर असलेल्या एका अल्पवयीनालाही ताब्यात घेण्यात आले आहे. वरद संजय खरटमल (वय २०, रा. कुदळेचाळ, वडगाव बुद्रुक), अमर हनुमंत बाभळे (वय २०, रा. धबाडी, वडगाव बुद्रुक), ओंकार रवी शिंदे (वय २२, रा. नऱ्हे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सराफी पेढीच्या मालक मंगल घाडगे (वय ५५, रा. सदाशिव दांगट नगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
वडगाव बुद्रुक येथील रेणुकानगरी भागातील गजानन ज्वेलर्समध्ये मंगळवारी दुपारी तीन चोरटे शिरले. त्यांनी घाडगे यांच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. सराफी पेढीतील पाच लाखांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा, खंडणीविरोधी पथक, दरोडा वाहन चोरी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखा, तसेच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तपास सुरू केला.
सीसीटीव्ही चित्रीकरणाच्य आधारे पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. दरोडा घालण्यापूर्वी चोरट्यांच्या अल्पवयीन साथीदाराने सराफी पेढीची पाहणी केली होती. पोलिसांनी अल्पवयीनाला ताब्यात घेतले. चौकशीत चोरट्यांनी नावे समजली. आरोपी खरटमल, बाभळे, शिंदे हे अहिल्यानगरला पसार झाल्याचे समजल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना सापळा लावून ताब्यात घेतले, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.